Saturday, August 22, 2020

‘कोरोनानामा’चा इत्यर्थ

लॉकडाऊन, अनलॉक, प्लाझ्मा दान वगैरे सा-या प्रकारचे उपाययोजना योजण्यात आल्या तरी कोरोना विषाणूच्या प्रसारात खंड पडला नाही. उलट कोरोनाबाधितांची आणि बळींची संख्या वाढत आहे. अर्थात बरे होऊन घरी परत जाणा-यांची संख्याही चांगलीच वाढली आहे. शनिवारी संपलेल्या २४ तासात कोरोनाबाधितांची संख्या ३० लाख २६ हजार ८०६ झाली असून मृतांची संख्या ५६६४८ झाली. बरे होऊन घरी परत जाणा-यांची संख्या ७४.६९ टकक्यांवर गेली आहे. मृतांची टक्केवारी १.८७ झाली. २१ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार १०२३८३६ रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली. ही सगळी आकडेवारी खोटी आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. परंतु वाढ निश्चितपणे चक्रावून टाकणारी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियम-निकषानुसार आपली आरोग्य यंत्रणा काम करत आहे. जगभर जागतिक आरोग्य संघटनेवर टीका होत असली तरी ना जागतिक आरोग्य संघटनेने आपले धोरण बदलले ना आपल्या आरोग्य यंत्रणेनेच्या धोरणात बदल झाला!

प्रसृत झालेल्या वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी पाहता रोजचा कोरोनामात लोकांना अपेक्षित असलेला अनुकूल फरक मात्र दिसलेला नाही. अर्थात त्याला कारणे आहेत. प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोना फैलावास सरकार जबाबदार असेल तर लोकही तितकेच जबाबदार आहेत! लोकल गाड्यांची वाहतूक मर्यादित करण्यात आली. केवळ कोकणवासियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली. जमेल तितके सुरक्षित अंतर राखून व्यवहार उरकण्यास परवानगी देण्यात आली. परंतु गणेशोत्सवानिमित्त भाजी आणि फुलांच्या बाजारात खरेदीची झुंबड मात्र उडालीच! सरकारने जनतेस मोकळीक दिली तरी सुरक्षित अंतर बाळगण्याच्या नियमांचा लोकांनी  फज्जा उडवला!  ही वस्तुस्थिती पाहता सरकारवर ताशेरे ओढण्याचा नैतिक अधिकार आपण गमावून बसलो आहोत!

पुनश्च हरिओम किंवा अनलॉक-१ ह्या घोषणा निव्वळ शब्दांचे बुडबुडे ठरले आहेत. सगळ्यात मह्त्त्वाचे म्हणजे अर्थव्यवहारास अपेक्षेनुसार चालना मिळाली नाही. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुनार कर्ज द्यायला बँका तयार आहेत. परंतु त्यामुळे लोक - व्यवहार वाढला नाही. बिल्डर मंडळींनी पुन्हा वृत्तपत्रात मोठमोठाल्या जाहिराती देण्यास सुरूवात केली तरी घरखरेदी करण्यास फारसे कुणी पुढे येताना दिसत नाही. जे चित्र घरांच्या बाबतीत तेच अन्य व्यापाउद्योगाच्या बाबतीत दिसत आहे! धडाडीने व्यवसायधंदा करायचा तर जवळचे थोडेफार भांडवल उधारीत अडकले जाण्याची भीती व्यापारीवर्गाला वाटत असते! महागाईमुळे लोकांची क्रयशक्ती संपल्यात जमा आहे. ह्या सगळ्यांना कोरोना इफेक्ट म्हणावा लागेल!

हरप्रकारच्या जिनसांचा व्यापार थंड असला तरी सोन्याचा व्यापारावर कोरोना इफेक्ट् झालेला नाही. १० ग्रॅम सोन्या भाव ५५ हजार रूपयांवर गेला. मुंबई शेअर बाजारावरही कोरोना इफेक्ट फारसा झालेला दिसत नाही. सेनेक्स आणि निफ्टीची ठराविक पातळी टिकवून ठेवण्याकडे सटोडियांचा कल दिसून आला! ह्या सगळ्याचा एकच अर्थ आहे. तो म्हणजे आपल्या नेहमीच्या व्यवसायातले भांडवल काढून घेऊन ते होलसेलर्सनी आणि बड्या उद्योगांनी शेअरचे भाव बाजार टिकवून धरण्यासाठी ओतले असावे! जास्त उत्पादन करून इन्व्हेंटरी वाढवत बसण्यापेक्षा शेअर बाजाराकडे पैसा वळवल्यास किफायतशीर ठरते हे त्यांना अनुभवान्ती माहित आहे.

देशात पुरेपूर उत्पादनक्षमता असूनही कोरानापूर्व काळात उणे जीडीपीकडे देशाची वाटचाल सुरू झाली होती. कोरोना हे निमित्त कारण आहे. कसेही असले तरी अर्थव्यवस्था चिंताजनक आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. एकीकडे मागणीचा अभाव तर दुसरीकडे देश कर्जबाजारी हा विरोधाभास देशाच्या कपाळी जुन्या काळापासून लिहला आहे. फरक इतकाच की मालाच्या टंचाईची समस्या नाही. समस्या आहे ती माल खरेदी करण्यासाठी लागणा-या आवश्यक पैशाची आणि उत्पन्नाची!  जीएसटीतील करांचे अफाट आणि तारतम्यहीन दर आणि निश्चित करण्यात आलेले टप्पे ही सुरूवातीपासूनची समस्या आहे. ह्या समस्येने व्यापारउद्योग बेजार झाले आहेत. साहजिकच त्याचा फटका लहान दुकानदार आणि ग्राहकांना सुरूवातीपासून बसला. कोरोनामुळे तो जाणवू लागला इतकेच!

पेट्रोल आणि डिझेल दराचा भस्मासूर वाहतूकदारांच्या मानगुटीवर बसला आहे. परिणामी वाहतूकदारांना दर वाढवण्याखेरीज पर्याय उरला नाही. म्हणूनच महागाई निर्देशांकात वाढ झाली. ती कमी होण्याची शक्यता दृष्टीपथात नाही. ह्यावेळी व्याजदरात वाढ करण्यात येणार नाही असे  रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी सूचित केले आहे. त्यातून चलन पुरवठा कमी होईलही. परंतु रिझर्व्ह बँकेची ही उपाययोजना दरिया में खसखससारखी ठरण्याचाच संभव अधिक. बेकार झालेल्या मजुरांना दरमहा ५०० रुपये आणि मोफत धान्य सरकारकडून दिले जाते. पण ह्या तुटपुंज्या उत्पन्नावर लोक किती काळ जगणार? अमेरिकेतही गरीबांना दरमहा ७०० डॉलर्सची मदत देण्यात येते. ७०० डॉलर्सच्या जोरावर अमेरिकेत भागू शकते! भारतात मात्र ५०० रुपयात आणि मोफत धान्यावर घर चालू शकत नाही. शेतमालाचा हंगाम येण्यास अद्याप अवकाश आहे. तोपर्यंतचा काळ निश्चितपणे कठीण आहे. कोरोनामाचा हा इत्यर्थ आहे.  तो कोणाला मान्य होवो अथवा न होवो!

No comments: