मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजला ‘फुगा’ म्हटल्याने भक्तांना राग येण्याचा संभव
आहे. परंतु प्रत्यक्षात सवलती देताना पात्रतेचा निकष लावला जातो हे आणि हे निकष
टाचणीसारखए ठरू शकतात हे भक्तांच्या गावी नाही. बँका, संबंधित
सरकारी अधिकारी ह्यांनी ठरवून दिलेल्या निकषांनुसार उद्योग पात्र ठरले नाही तर
जाहीर झालेल्या सवलतींचा काडीचाही उपयोग नाही. म्हणजेच फुग्यातील हवा निघाल्यानंतर
जे काही होते तसे ह्या सवलतींचे झाल्याशिवाय राहणार नाही. उद्योग सूक्ष्म, लघु किंवा मध्यम असला म्हणून काय झाले? तो
अपात्र असेल तर त्याला मदत करायची का? अर्थात नाही असेच
ह्या प्रश्नाचे उत्तर आहे! दान जसे सत्पात्री असावे तशी मदतदेखील सत्पात्री असावी
हे मान्यच आहे. कोविड-१९ मुळे किती नुकसान झाले हे अधिकारीच ठरवणार. किती मदत
द्यायची हेदेखील अधिकारी ठरवणार! हे ठरवण्यात नेहमीच ‘गडबड’
होते. आणि म्हणूनच राजकारण्यांना लुडबूड करण्याची संधी मिळते असा
आजपर्यंतचा अनुभव आहे.
कोविड-१९ मुळे उद्योगांचे नेमके किती
नुकसान झाले किंवा कोरोना संकट आणखी जास्त काळ सुरू राहिल्यास किती नुकसान संभवू
शकते ह्याबद्दल अंदाज व्यक्त करण्यास निर्मला सीतारामन् ह्यांनी असमर्थता व्यक्त
केली. खरे तर, अशा प्रकारचा अंदाज बांधणे शक्य नाही
ह्याची चक्क कबुली निर्मला सीतारामन् ह्यांनी दिली! सीतारामननी दिलेली कबुली पाहता
पंतप्रधान कार्यालय आणि वित्त मंत्रालय ह्यात पुरेसे समन्वय नाही हेच दिसले.
बाकी, कोरोना
संकटाशी मुकाबला करत असताना हातचे काहीही राखून न ठेवता जनतेला विशेष काही
देण्याची हीच वेळ आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटले हे निश्चित महत्त्वाचे
आहे. पंतप्रधानांची समस्या आहे ती त्यांच्या स्वभावात, वाणीत
मुरलेल्या भाजपा संस्कृतीची! वाचाळता हे भाजपा संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. देशाला
उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींना मूळ मुद्द्यावर यायला अर्धा तास
लागला. निर्मला सीतारामन् ह्यांनाही मूळ घोषणेपर्यंत येण्यासाठी तब्बल अर्धा तास
लागला. आधी कोणत्या सवलती दिल्या ह्याचे पुराण सीतारामन् ह्यांनी लावले. सध्या मूळ
मुद्द्याला भिडण्याचा काळ आहे. परंतु मूळ मुद्द्याला भिडणे सोपे नसते. मूळ
मुद्द्याला भिडण्याठी अहोरात्र चिंतनाची आवश्यकता आहे. ह्या बाबतीत निर्मला सीतारामन् कमी पडल्या हेच
पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत दिसून आले.
सूक्ष्म, लघु
आणि मध्यम उद्योगांचे दुखणे फार जुने आहे. किंबहुना म्हणूनच हे सारे उद्योग
सूक्ष्म, लघु आणि मध्यम राहिले! मजूरवर्ग, कर वसुली यंत्रणेतील अधिकारी आणि बँक व्यवस्थापक ह्यांच्यापुढे हात
टेकल्य़ाखेरीज उद्योग चालू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. गेल्या कित्येक
वर्षांपासून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोगचालकांच्या मनात
अगतिकतेची भावना निर्माण झाली आहे. उद्योग चालवण्यापेक्षा नोकरी केलेली बरी असाही
विचार त्यांच्या मनात अधुनमधून डोकावून जातो. कोरोना संकटातून देशाचे ठप्प झालेले
अर्थतंत्र फिरवण्याच्या निमित्ताने का होईना, पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी टी. व्ही. चॅनेलवरून प्रभावी भाषण केले. त्यांच्या भाषणामुळे
सूध्म, लघु आणि मध्यम उद्योगातील अगतिकतेची भावना
संपुष्टात आली तर आनंदच आहे.
No comments:
Post a Comment