Saturday, May 23, 2020

असा हा कोरोना जसा तवा चुल्ह्यावरी!


गेल्या २४ तासात कोरोनाबाधित रूग्ण, बरे झालेले रूग्ण आणि मरण पावलेले रूग्ण ह्यांचा  आकडा वाढतोय्!  विशेष म्हणजे चौथ्या टाळेबंदीत कोरोनाची भीतीही वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात करोना रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजार ४२३ झली असून मृत्यू पावलेल्यांची संख्या २८६८ झाली आहे. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ५४ हजार ३८५ झाली आहे. राज्यातल्या कोरोना संकटाचे चित्रही देशाच्या चित्राशी मिळतेजुळते आहे. राज्यात १२५०० कोरोनाबाधित रूग्ण असून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ५१७८४ आहे तर मृतांची संख्या ३७२० झाली आहे. कोरोना संकट आलेले असताना पश्चिम बंगाल आणि ओरिसा हया तटवर्ती राज्यात चक्री वादळाचे संकटही आले. लष्कर वेळेपूर्वीच मदतीला धावून गेल्यामुळे दोन्ही राज्यांची स्थिती पुष्कळ आटोक्या राहिली. तरीही दोन्ही राज्यात घडायचा तो विध्वंस थोडाफार घडलाच!
सध्याचे संकट दुहेरी आहे. बेरोजगारीत अन्नधान्याभावी मरायचे की कोरोनाने मरायचे? अवघी मानवजात ह्या व्दंदात सापडली असली तरी भारताततेल व्दंद जरा जास्तच तीव्र आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्त्येकाने मास्क, सुरक्षित अंतर आणि प्रतिकारशक्तीनिशी लढत आपला कामधंदा शक्य तितक्या सुरू करायचा ह्या बाजूने जनमताचा कौल आहे!  म्हणून जगभराताल अनेक देशात सुधारित टाळेबंदी जारी करण्यात आली आहे. तशी ती भारतातही जारी करण्यात आली आहे. मात्र, एक ठसठशीत फरक नजरेत भरल्याशिवाय राहात नाही. जगातील शासनव्यवस्थेकडून दिसून आलेली कार्यक्षमता आणि भारतातल्या प्रशासनाची दिसून आलेली कार्यक्षमता ह्यात जमीनअस्मानचा फरक आहे. जगातले राजकारणी आणि भारतातले राजकारणी ह्यांची तुलना न केलेली बरी! 
चौथ्या टाळेबंदीचे चित्र पारसे चांगले नाही. देशात सर्व पातळीवर अडाणी राजकारण्यांचा सुळसुळाट पूर्वीपासून सुरू होता. कोरोनामुळे तो कमी झालेला नाही. कोरोनापूर्व परिस्थिती आणि कोरोनानंतरची परिस्थिती ह्याबाबतचे राजकारण्यांचे आकलन जेमतेमच आहे. देशभऱातील विद्यापिठांना परीक्षांपलीकडे काही सुचले आहे असे दिसत नाही. विद्यार्थीवर्गास कोरोना लढाईत प्रत्यक्ष सहभागी करून घ्यायचे त्यांना काही सुचले नाही. कोविड-१९ ह्या विषयावर संशोधन प्रकल्प ताबडतोब हाती घेण्याचे महाविद्यालयातील विज्ञान विभागांना सांगता आले असते. एकाही मेडिकल कॉलेजमध्ये केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून सुरू असलेल्या प्रयत्नात सिनियर वैद्यकीय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मेडिकल कॉलेजच्या विभाग प्रमुखांना संशोधनात सहभागी करून घेण्यास भरपूर वाव आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली असली तरी त्यांच्या मदतीला महावद्यालयीन विद्यार्थीवर्गास देता आले असते. केंद्राचे आणि अनेक राज्यांचे मंत्र्यांचे नेहमीचे उद्योग सुरू आहेत. भाषणबाजी, राज्यपालांकडे चुगल्याचहाड्या, व्टीटरबाजी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची रेलचेल हे सगळे त्यांचे उद्योग नेहमीप्रमाणे सुरू आहेत. भारताचा मृत्यूदर जगाच्या तुलनेने कसा कमी आहे हे प्रसारमाध्यमांच्या मदतीने पटवून देण्यातच राज्यकर्ते आत्मग्न आहेत तर सरकारच्या घोषणा कशा पोकळ आहेत हे दाखवून देण्यात विरोधी नेते आत्ममग्न आहेत! अर्थात ते स्वाभाविक आहे. सनदी अधिका-यांच्या मदतीने सत्ता राबवण्यापलीकडे कुठलीच कामगिरी केल्याचे त्यांच्या नावावर नमूद नाही.
कोरोनावर औषध किंवा प्रतिबंधक लस शोधणा-यांची एक देशव्यापी टीम इंजियन मेडिकल असोशिएशनच्या मदतीने सरकारला स्थापन करता आली असती. संशोधनाच्या परंपरा असलेली विद्यापीठे भारतात निर्माण झालेली नाही. अजूनही काही महाविद्यालयांना रिसर्च संस्थेचा दर्जा देण्याच्या दृष्टीने हालचाल करता येईल. देशातील बहुतेक विद्यापिठांचे आणि महाविद्यालयांचे एकच काम आणि ते म्हणजे नियमित परीक्षांचे व्यवस्थापन करून पदव्यांचे वाटप करायचे! कोविड-१९ केसेस हाताळण्याच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेकडून जितका डोस मिळतो तितका तो इमानदारीपूर्वक प्राशन करायचा एवढेच तूर्तास आपले काम आहे अशी समजूत आपल्या आरोग्य यंत्रणेने करून घेतली आहे.
कोरोना संकट यायच्या आधी ६ वर्षांत विकासाचा ध्यास घेतलेल्या सरकारला डिजिटल इंडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कर्जमाफी वगैरे वारेमाप गोष्टी मोदी सरकारने सुरू केल्या. त्याचा वारेमाप डांगोराही पिटण्यात आला. परंतु आता आले तसे कोरोना संकट आले तर ते कसे हाताळायचे ह्यासंबंधी विचार करावा असे राज्यकर्त्यांना वाटले नाही.  विचार करावासा वाटण्याचे कारणही नाही!  नाही म्हणायला गोमुत्राचे संशोधन, निरनिराळ्या प्रकारचे काढे घेण्याचा सल्ला देण्यास सत्ताधारी पक्षाचे नेते पूर्वीपासून सवकलेले होते. कोरोना संकटात त्यांना अधिक चेव आला इतकेच. देशभक्ती आणि देशप्रेम ह्याखेरीज जनतेला पाजण्यासाठी कोणताही डोस त्यांच्याकडे नाही. पुढा-यांची तीच तीच सनसनाटी भाषणे प्रसारित करण्याखेरीज मिडियाचादेखील नवे काही प्रसारित करण्याचा उत्साह दिसला नाही. ह्युमन इंटरेस्ट स्टोरीजदेण्याचे त्यांचे जन्मजात स्वातंत्र्य आहे. ते बजावण्यातच इतिकर्तव्यता असल्याचे ते समजून चालले आहेत!
जगात कोरोनावरील औषधांची आणि लशींची चाचणी घेण्यासाठी तसेच प्लाझ्मा दान करण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे. कोरोना रूग्णास प्लाझ्मा चढवल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढून रूग्ण बरे होण्यास मदत होऊ शकते. भारतातही काही ठिकाणी हा प्रयोग झाला. मात्र. इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना डोळ्यांवर पट्टी आणि हाताची घडी बांधून स्वस्थ बसल्या आहेत. संघ स्वयंसेवकांना प्लाझ्मादानासाठीव नाव नोंदणीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यास सरकारी गुरू मोहन भागवत ह्यांनी करायला हरकत नव्हती. राष्ट्रसेवादलासही असे आवाहन करता आले असते. पण राष्ट्र सेवादल स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे की नाही ह्याबद्दल साशंकता आहे!
कोरोना संकट हे चुलीवरच्या तव्यासारखे आहे. तू जा असे म्हटल्याने कोरोना देशातून जाणार नाही. तो जाईल; परंतु हाताला चटके दिल्याशिवाय नाही! अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर ही बहिणाबाईंची कविता संसाराला जितकी लागू पडते तितकी देशाच्या संसारालाही लागू पडते. विशेषतः कोरोना संकटाच्या काळात तर ती हमखास लागू पडते! देशाच्या संसाराला कोरोनाचे चटके बसल्याशिवाय कोणालाही भाकरी मिळणार नाही.
रमेश झवर
ज्योष्ठ पत्रकार

No comments: