Monday, May 4, 2020

कोरोना... हे करा ना!


कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी  आणि कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून केल्या जाणा-या प्रयत्नांना नेत्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी कोरोनाविरूध्द लढाईची उपमा दिली होती!  कौतुक करण्यासाठी ती ठीक होती. परंतु कोणतीही उपमा ही पूर्णोपमा नसते. ह्याचे भान बाळगणे जरूर आहे. कोरोना विषाणूविरूध्द लढा देतांना प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याबद्दल डॉक्टर, नर्सेस आदींचे कौतुक करण्यासाठी अनेक देशात छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आले. जगभरातल्या ह्या नवशिक्या राजकारण्यांचे अनुकरण भारताने करावे का? हवा, पाणी धूळ किंवा एखादा प्राणी-पक्षी ह्यापैकी कोरोना विषाणूचा वाहक नाही. असलाच तर माणूस हाच करोना विषाणूचा वाहक आहे. म्हणूनच सुरक्षित अंतर राखून व्यवहार करा. ह्यखेरीज सांगण्यासारखए काही नाही. विषाणूचे संक्रमण झाले आहे की नाही हे चाचणी केल्याखेरीज कळू शकत नाही. म्हणूनरॅपिड टेस्ट सुरू करण्यात आल्या. कोरोना रूग्ण आढळून आला तरी सध्या तरी न्यूमोनियावर केले जाणारे उपचारच कोरोनाच्या रूग्णावरही केले जातात. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस शोधून काढण्यात यश मिळून लशीचे मास प्रॉडक्शन सुरू होत नाही तोपर्यंत तरी आपणा सर्वांना प्रतिक्षा करावी लागेल..
चीनच्या हुआन प्रांतात २०१९ च्या  डिसेंबरात जन्मलेला कोरोना विषाणू पाहता पाहता जगभर पसरला. ह्या विषाणूच्या बाधेमुळे इटाली, स्पेन आणि अमेरिकेत अनेक लोक बळी पडले. अमेरिकेत तर बळींची संख्या व्हिएतनाम युध्दात ठार झालेल्या अमेरिकन सैनिकांपेक्षाही अधिक आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रूग्ण, कोरोना बळी, क्वारंटाईनच्या उपायाने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढती आहे हे आरोग्य खात्याने नाकारलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत तरी सुरक्षित अंतर राखून जीवनव्यवहार कसे पार पाडावे ही समस्या आहे. त्या समस्येवर टाळेबंदीखेरीज अन्य उपाय नाही. टाळेबंदीची मुदत २ आठवड्यांनी वाढवण्यात आली खरी,  ७२० जिल्ह्यात जीवनव्वहाराच्या गरजेनुसार स्थानिक परिस्थितीनुसार टाळेबंदीचे नियम कमीअधिक प्रमाणावर शिथील करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आला आहे. पण टाळेबंदीला लोक कंटाळलेल्या लोकांचा उद्रेक झालेलाही अधुनमधून पाहायला मिळतो.  
कोरोना परिस्थिती प्रशासनाने कितीही कौशल्यपूर्वक हाताळली तरी प्रशसनाला शंभर टक्के यश आले आहे असे म्हणता येत नाही. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती केवळ अभूतपूर्व आहे हे त्याचे खेर कारण आहे.  इस्पितळांना तर प्रशसनापेक्षाही भयंकर समस्यांना तोंड द्यावे वागत आहे. रोजच्या प्रसारमाध्यमात त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. कोरोना पेशंटला तपासण्यासाठी जे किट्स उपलब्ध झाले ते सदोष असल्याच्या तक्रारी आहेत. मास्क वापरा असा धोशा सतत लावण्यात येत असला तरी परवडण्याजोगे मास्क उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती मिडियावर दृष्टी टाकली की सहज लक्षात येते. कोरोना खास रूग्णालये, क्वारंटाईनच्या सोयी, कोरोना तपासणी करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य सेवेकरी ह्या सर्वांना रोस्टरनुसार काम करावे लागते. काम संपले की रोस्टरच्या व्यवस्थेनुसार त्यांना स्वतःला जवळच्या इमारतीत क्वारंटाईनमध्ये जावे लागते. देशातील सर्व जिल्ह्यांना किट्स, मास्क, औषधे पाठवण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु हे सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचले का? मिळाले असतील तर सुस्थितीत मिळाले का? जिल्हा कलेक्टरांचा फीड बॅक का नाही? प्रसारमाध्यमांच्या कार्यपध्दतीत ही मोठीच त्रुटी आहे. कोरोना रूग्ण हुडकून काढून त्यांची तपासणी चाचणी केली जात असल्याचा व्हिडिओ अहवाल राष्ट्रीय चॅनेलवर का प्रदर्शित केला जाऊ नये?  डॉक्टरांवर हवाई दलाच्या चॉपर विमानातून पुष्पवृष्टी करण्यापेक्षा उपचार करणा-या डॉक्टरांचे, रूग्णसेवसाठी झटणा-या नर्सेसचे व्हिडिओ लोकांना पाहायाला मिळाले तर लोकांना अधिक धीर येईल. पुष्पववृष्टी करणायासाठी हवाई दलाच्या विमानांच्या उड्डाणास आणि नौदलातील युध्दनौकांवर रोषणाई करण्यास जेवढा खर्च आला  तेवढ्या खर्चाच हजारो रूग्णांच्या सेवेत वृध्दी करता आली असती. डॉक्टर, नर्सेस, अन्य सेवक ह्या सर्वांवर अधिक खर्च करा ना! त्यांच्यासाठी रातोरात चांगली निवासस्थाने, स्वच्छ प्रसादनगृहे इत्यादि बांधणे अशक्य नव्हते. रस्त्यांवर उन्हातान्हात काम करणा-या हवालदारांना, कनिष्ट पोलिस अधिका-यांवा अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही ह्यादृष्टीने काय करता येईल हेही आवर्जून पाहायला हवे होते. .
कोरोनाच्या संदर्भात हारजीत किंवा विजय मिळवण्याची भाषा ही काहीशी नाटकी वाटते. ती आवश्यक असेलही; परंतु भाषेला किती महत्त्व देणार? गुणकारी कटू औषधाच्या तुलनेने अनुपानाला महत्त्व कमीच! पुढच्या काळात कोरोनासह कसे जगावे ह्याचा विचार जगात सुरू झाला आहे. कोरोना राहणारच, तेव्हा योग्य प्रकारचा मास, सुरक्षित अंतर राखून कामधंदा करणे, इत्यादि नवे वास्तव मान्य करायला हवे. भारतासह जगभरातल्या देशांना लौकरच न्यू नॉर्मलहा शब्दप्रयोग स्वीकारावा लागेल!
कोरोना स्वीकारण्याची वेळ शक्यतो येऊ नसे;  पण ती आलीच तर हे सगळे स्वीकारण्याची तयारी करा ना!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: