मध्यप्रदेशातले औरंबाबादजवळच्या एका लहानशा
स्टेशनाजवळ १४ मजूर रूळमार्गावर गाडीखाली सापडडून ठार झाल्याच्या बातमीमुळे
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात दुःखाची छाया पसरली. थेट पंतप्रधानांपासून ते थेट
मुख्यमंत्र्यापर्यत अनेकांनी ह्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. कोरोनाचा फैलाव
सुरू झाल्यानंतर देशभरात पसरलेला मजूरवर्गाला स्वतःच्या प्रांतात परत फिरण्याची ओढ
लागली. सरकारने त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्याची, त्यांना थोडाफार पगार
मिळण्याची घोषणा केली. तरीही मजूरवर्गाने शहरात राहण्यास नकार दिला. टेंपो,
ट्रक-टँकरसारख्या वाहनातून, प्रसंगी चालत आपल्या जेथून आले तेथे ते परत निघाले!
रोजगारासाठी एका प्रांतातून दुस-या प्रांतात जाणरा मजूरवर्ग फक्त मुंबई
महानगरापुरताच सीमित नाही. तो मुंबईत आहे तसा दिलीतही आहे. कोलकोत्यात आहे तसा
चेन्नई आणि हैद्राबादेतही आहे. लखनो, इंदूर, भोपाळ, बडोदा पुणे, औरंबाद, जयपूर
ह्यासारख्या शहरातही आहे. नव्वदच्या दशकात नगरविकास मंत्रालयाने संसदेस सादर
केलेल्या अहवालात जलद गतीने वाढणा-या ३५ शहरांची यादी देण्यात आली होती. त्या
यादीत कल्याण शहराचाही समावेश करण्यात आला होता. शहरीकरणाचा वेग कमी झाला नाही. ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नांदेड, पिंपरी-चिंचवड,
नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार, डहाणू अशी अनेक शहरे वाढत आहेत. त्या सगळ्या शहरात
परप्रांतीयांची संख्या लक्षणीय आहे. ह्याचा अर्थ अन्य जिल्ह्यात परप्रांतीय नाही
असे मुळीच नाही. उत्तरप्रदेश, राजस्थान, हरयाणा इत्यादि अनेक राज्यातले ठाकूर,
सिंग, राठोड, मिश्रा, चौबे महाराष्ट्राच्या सर्वत्र वास्तव्य करून आहेत. परदेशी
आडनावाची माणसे ठाकूरच. पारशी, नेपाळी,
ज्यू इत्यादि मंडळी मुंबईत आहेत. डहाणू, नाशिक, जळगावमध्येही एखाददुसरे पारशी
कुटूंब आहे. असा हा ८ कोटींचा महाराष्ट्र आता १२ कोटींचा झाला!
कोण आहेत हे सगळे मजूर? मूळ गावी उपजीविकेचे काहीच साधन नसलेल्यांना मजुरी
खेरीज पर्याय नाही. दीडदोन एकर शेती असणा-या शेतक-यांची शेतीवर गुजराण होणे शक्य
नाही. हे सगळे शेतकरी, सुतार, गवंडी तर मुंबईला आलेच, शिवाय प्लंबर-काम,
इलेक्ट्रिशियनची, सु-याकात्रींना धार लावणे वॉटर प्युरीफायर दुरूस्त करणे,
कपड्यांना इस्त्री करणे, स्टेशनावर हमाली इत्यादि स्वयंरोजगार त्यांनी पत्करला. सिझननुसार फळांचा व्यवसाय करणा-यांची मोठी
संख्या मोठी आहे. भांड्यांना कल्हई लावणारे हल्ली दिसत नाही. पाण्याच्या टाक्या
चढवण्याची, त्यांची साफसफाई करण्याचे काम, बांधकामाच्या ठिकाणी ‘माल’ तयार करणारे किंवा
रस्त्याच्या ठिकाणी खडी, वाळू बिछवण्याची कामे करणारे, रोडरोलर-फोरक्लीप चालवणारे
इत्यादि नाना प्रकारचे मजूर आहेत. अंगच्या कौशल्यानुसार त्यांना ब-यापैकी रोजगार
मिळतो. रोजंदारीतून मिळणा-या पैशातून
थोडीफार बचत करून ते गावी पाठवतात. तो पैसा शेतीसाठी लागणा-या खते-बीबियाण्यासाठी,
मुलांचे शिक्षण इत्यादिसाठी वापरला जातो. आंध्र, उडिशा, तेलंगणा, उत्तरप्रदेश,
बिहार, वगैरे प्रांतातून आलेले आहे. उत्तरप्रदेश आणि बिहार ह्या प्रांतातले
बहुसंख्य मजूर एकाच खोलीत सातआठ जण राहतात. गुजारा करतात! हाताने स्वैंपाक
करतात. ह्यापैकी काही मजुर ‘रामायण मंडळे’ चालवतात. सुटीच्या दिवशी किंवा ठराविक दिवशी ह्या
संडळात ते ‘तुलसी रामायणा’चा ‘पाठ’ करतात. अर्थात
दारू पिऊ निपचीत पडून राहणारेही आहेत!
सातारा-सांगलीहून आलेले मुंबईत गिरण्यात कामाला आलेले मजूर आता फारसे
उरले नाहीत! गोदी, दाणाबंदरात किंवा आता वाशी मार्केटमधअध्ये
अंगमेहनतीची कामे करणा-या वर्गात सातारा-सांगली ह्या दोन जिल्ह्यातून आलेल्या
मजुरांचा भरणा फार मोठा होता. हे सगळे मजूर सामायिक तत्त्वावर खोली भाड्याने घेऊन
एकत्र राहात. ह्यापैकी अंगमेहनतीची कामे करणा-यांनाच ‘माथाडी’ संबोधले गेले! वर्षातून एकदा पंढरीची,
आळंदीची वारी करणारा वर्ग हाच! मुलांना
त्यांनी शिकवले. शिक्षणात गती नव्हती अशा मुलांना सुरूवातीला ‘बदली कामगार’ म्हणून आणि नंतर
जॉबरला पटवून गिरणीत चिकटवण्यात त्यांना यश मिळाले. कोकणातून आलेल्या बाल्यांना तर
गुजराती मंडळींच्या घरी घरकामे मिळाली. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे शेटाणींकडच्या
चाव्या त्यांच्या हातात आल्या! गोकुळ अष्टमाच्या दिवशी दहीहंडीचा खेळ खेळणा-या
रामा गड्यांना ‘करसनभाईँ’च्या घरात
प्रेमादराचे स्थान मिळाले नसते तरच नवल होते.
विसाव्या शतकाच्या सुरूवातीला मालवणचा मजूर जसा मुंबईत पोहचला तसा तो
कराचीलाही पोहचला. तिघे जण तर कराची म्युनिसिपालिटीत निवडूनही आले. कराचीतल्या
मजुरांनी छापखाने, छोटीमोठी डागडुजीडी कामे केली. भारत-फाळणीनंतर बहुतेक सगळे
भारतात आले आणि मुंबईला स्थायिक झाले. काही नशीबवानकोकणी माणसाला शिक्षक, पोलिस,
गोदीत कारकून, खासगी पेढ्यातही नोक-या मिळाल्या. तरीही पु. रा. बेह-यांनी
म्हटल्याप्रमाणे ‘अरबांचा पैसा
परबांना’ मिळाला नाही! अरबांचा पैसा
परबांना मिळण्यापेक्षा केरळीय माणसाला मिळाला. मराठवाड्याचा मजूरही मुंबईत मोठ्या
प्रमाणावर मुंबईत आला न् मुंबईच्या कामगारवर्गात केव्हा मिसळून गेला ते कळलेसुध्दा
नाही.
गिरणीउद्योगाचे वाईट दिवस सुरू होण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे ह्यांच्या प्रेरणेने अनेक मराठी माणसांनी पजापावच्या गाड्या लावल्या.
त्यापूर्वी खाऊ गल्लीत पावभाजीचा शोध लागला होताच. फोर्ट भागात चहा, उकाळाची
टपरीवजा दुकाने आधीपासून सुरू झआलेली होतीच, परप्रांतीयमुळे मसाला दोसा,
इडलीसांबार, पंजाबी लोकांनी हॉटेले सुरू केली. तंदुरी रोटीने पोळी भाजीला हरवले.
पुण्यात मिसळ जिंकली. भय्या लोकांनी भेळपुरी-पानीपुरी, खारे शेंगदाणे आणि मडक्याचे
पाणी विकून चौपाट्या पादाक्रांत केल्या. काही मंडळींनी फोर्ट भागात फूटपाथवर जुनी
पुस्तके विकण्याचा धंदा सुरू केला. ह्या सगळ्यांना मुंबईकरांनी उदार आश्रय दिला! चणेफुटाणे आणि वर्तमानपत्रांच्या
व्यवसायावरदेखील उत्तरभारतीयांनी कबजा केला. टॅक्सी, टेंपो, रिक्शा ह्यांचा फार
मोठा धंदा मुंबई महानगरात सुरू झाला. नोकरी करणारा कामगार आणि स्वयंरोजगारावर
भिस्त ठेवणाराही कामगारच!
मुंबईतला गिरणी उद्योग उठला. तो उठण्यापूर्वी उत्तरभारतीयांची गिरण्यात
हडेलहप्पी सुरू झाली. ही सगळी मंडळी जिवाजी कलमदाने वर्गातली होती. मराठी माणसांचे
नोकरीचे स्वप्न ह्या वर्गानेच उद्ध्वस्त केले. कसली नोकरी न् कसले काय, अशी मराठी
माणसांची स्थिती झाली! मराठी कामगारांचा वर्ग गेल्या दोनतीन दशकात देशोधडीला लागला. गिरण्या
अन्यत्र हलल्या. हलवल्या गेल्या! भिवंडीत लूम उद्योग भरभराटीस आला. परंतु लूम
उद्योगात कामगार म्हणून परप्रांतीयांचा भरणा झाला. अर्थात ह्या मजूरांना कायद्याचे
कुठलेही संरक्षण मिळण्याचा प्रश्न नव्हता. १ ते १० तारखेपर्यंत पगार, किमानवेतन
कायदा, साप्ताहिक सुटी हे कामगारांना कम्युनिस्टांनी मिळवून दिलेले संरक्षण
पूर्णतः संपुष्टात आलेले होतेच. मग ते भिवंडीत कसे येणार?
असा हा मजूरवर्ग! त्यांना रोजगार मिळाला तर बातमी येत नाही. त्यांचे
दिसाचे उत्पन्न कमजास्त झाले तरी त्याची बातमी होत नाही. शेकडो उद्योग बंद पडले
लाखो मजूर बेकार झाले. त्यावेळी काय त्याच्या बातम्या आल्या असतील तेवढ्याच. कोरोनामुळे
हा मजूरवर्ग अचानक पुन्हा बातमीत आला! तो घर परत निघाला म्हणून!!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment