Wednesday, May 6, 2020

प्लाझ्मा आला मदतीला


कोरोना रूग्णाला वाचवण्याच्या अखेरच्या उपचाराचा एक भाग म्हणून का होईना, प्लाझ्मा थेरपीने ब-या झालेल्या कोरोना रूग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रूग्णाच्या शरीरात चढवणास संमती देण्याची तयारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ह्या संस्थेने दर्शवली आहे. आजघडीला तरी अत्यवस्थ झालेल्या कोरोना रूग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून कसेबसे वाचवण्याचा प्रयत्न करण्याखेरीज डॉक्टरांच्या हातात काही नाही. ब-या झालेल्या कोरोना रूग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा काढून तो अत्यवस्थ कोरोनाग्रस्त रूग्णाला चढवल्यास रूग्णाची प्रतिकार शक्ती वाढून तो बरा होऊ झाल्याचे व्हिडियो परदेशातील आणि भारतातील टी व्ही वर पाहायला मिळाली. प्लाझ्मा थेरपीने ब-या झालेल्या आणि ब-या न झालेल्याही रूग्णांची संख्या, अन्य गुंतागुंत उद्भवण्याची शक्यता वगैर तपशील पाहिल्याखेरीज ह्या उपचारपध्दतीला मान्यता देण्यास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची ना होती. अर्थात अजून पुरेसा पुरावा नाही असे उत्तर डॉ. रमण गंगाखेडकर ह्यांनी प्रेसबिरिफींगच्या वेळी दिले होते. एखादी उपचारपध्दती योग्य की अयोग्य, हे पुरेशा पुराव्याभावी बरोबर ठरवणे योग्य नाही हे डॉ. गंगाखेडकरांचे मत बरोबरच होते. कोणत्याही उपचारपध्दतीतले धोके असतातच. धोके लक्षात घेऊन ते टाळण्याच्या दृष्टीने कोणते उपाय योजायचे हे पाहिल्याखेरीज त्या उपचारपध्दतीला मान्यता देता येत नाही ह्या त्यांच्या भूमिकेला आक्षेप घेण्यासारखे काही नाही.
प्लाझ्मा थेरपीला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची मान्यता मिळाली तर ही उपचारपध्त डॉक्टर मंडळी लगेच स्वीकारतील असे नाही. प्लाझ्मा उपचार पध्दतीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडूनही मान्यता मिळववावी लागेल. अर्थात तो बराचसा तांत्रिक भाग असून मान्यता देण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हरकत घेईल असे वाटत नाही. सुरक्षित अंतर राखून व्यवहार करणे, त्याहीउप्पर कोरोनाची बाधा झालीच तर रूग्णावर न्यूमोनियावर केले जाणारे उपचार सुरू करणे हे सध्या जगभर सुरू आहेच. प्रश्न आहे तो रूग्णाची अवस्था गंभीर झाल्यास त्याला व्हेंटिलेटर ठेवण्याखेरीज पर्याय डॉक्टरांकडे नाही. प्लाझ्मा थेरपीमुळे हा आणखी एक पर्यायी उपचार डॉक्टरमंडळींना उपलब्ध झाला हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे.
कोरोना उपचाराच्या बाबतीतच नव्हे तर जागतिक आरोग्य क्षेत्रात जे सुरू आहे ते भारतातही सुरू झाले आहे ही बाब भारताच्या दृष्टीने अभिमानस्पद आहे. प्लाझ्मा थेरपी म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यापूर्वी प्लाझ्मा म्हणजे काय ते समजून घेणे उपयुक्त ठरेल. रक्तातून लाल आणि पांढ-या रक्तपेशी तसेच अन्य घटक, प्लेटलेट्स इत्यादि काढून घेतल्यानंतर उरलेला ५५ टक्के पिवळसर पदार्थ म्हणजे प्लाझ्मा. ९० टक्के पाणी असलेल्या प्लाझ्मामुळे रक्त शरीरभर खेळण्यास मदत होते. शरीरभऱ खेळणा-या रक्तातूनच महत्त्वाचे क्षार, एन्झीम्स लाल पेशी शरीरात सर्वत्र पोहचतात. महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मिळते ती प्लाझ्मामुळेच. जखम झाल्यानंतर रक्तस्राव सुरू होतो तेव्हा ते गोठायला मदत होते ती प्लाझ्माचीच. ह्याखेरीज शरीरान्तर्गत अनेक महत्त्वाच्या क्रियाप्रक्रिया चालू ठेवण्याचे कार्य प्लाझ्मा करते. निरोगी माणसाच्या शरीरातून रक्ताचे रक्त असलेला प्लाझ्मा काढून दुस-या माणसाच्या शरीरात तो घालून त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्याला तंददुरूस्त करण्यास मदत होते. प्लाझ्मा चढवण्याच्या प्रक्रियेलाच प्लाझ्माफेरीरिसिस अशी संज्ञा आहे.
कोरोना उपचारात प्लाझ्मा थेरपी समाधानकार उपचार ठरल्यास कोरोनाच्या साथीला आळा घालण्याच्या बाबतीत भारताला लक्षणीय यश मिळेल. त्याचे निष्कर्ष लशीच्या संशोधनातही उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. जगभर सुरू असलेल्या मेडिकल संशोधनात प्रयोगात भारताचा वाटा आहे. मागे जेनामसंबंधी जागतिक संशोधनात डोळ्यांशी संबंधित जेनाम प्रकल्पाचा वाटा उचलण्याची संधी चेन्नईच्या शंकर नेत्रालयाला मिळाली होती. कोरोना उपचाराशी संबंधित प्लाझ्मा थेरपीसंबधी सुरू असलेल्या प्रयत्नात भारताचा सहभाग आपल्या मेडिकल व्यवसायाला भूषणावह आहे!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

  

No comments: