Thursday, April 2, 2020

महाभारत युध्दाचो राजकारण

रामायणाप्रमाणे महाभारत मालिकेचे प्रसारण सध्या दूरदर्शनावर सुरू आहे. रामायणाविषयक संशोधनावर लिहल्यानंतर महाभारत युध्दासंबंधीदेखील लिहणे मला सयुक्तिक वाटते. अर्थात महाभारतावर विस्तृत  लिहण्याइतकी क्षमता माझ्याकडे नाही. महाभारत युध्द इसवीसनपूर्व ३१४० च्या सुमारास झाले, असा निष्कर्ष भारताचार्य चिंतामणराव वैद्य ह्यांनी महाभारतातील अंतर्गत पुराव्यांची छाननी करून काढला. चिंतामणराव वैद्य, रा. गो. भांडारकर, लोकमान्य टिळक, इतिहासाचार्य राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर इत्यादि अनेकांनी प्राचीन भारतीय इतिहासाचे सांगोपांग संशोधन केले. महाभारताच्या संशोधनावर सर्वांनी भर दिला ह्याचे कारण पाश्चात्य संशोधकांनी केलेल्या संशोधनातला अनैतिहासिक भाग खोडून काढून स्वतःचे संशोधन त्यांनी वाचकांपुढे ठेवले. त्या संपूर्ण संशोधनाचा परामर्ष न घेता महाभारत युध्दाची बीजकारणांचा अगदी ओझरता परामर्ष ह्या ब्लॅगलेखात घेण्याचे मी योजले आहे.
कौरव-पांडवात झालेल्या महाभारत युध्दाची ठिणगी काही एकाच घटनेने पडली असे नाही. विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर हस्तिनापूरच्या गादीवर ज्येष्ठ पुत्र धृतराष्ट्रचा स्वाभाविक अधिकार होता. परंतु धृतराष्ट्र हा जन्मांध असल्याने राजगादीवर बसण्याचा त्याला अधिकार नव्हता. तत्त्कालीन राजकीय संकेतानुसार अंगविहीन व्यक्ती राजगादीवर बसू शकत नव्हती. म्हणून पांडु हा विचित्रवीर्याचा धाकटा पुत्र असूनही त्याला राजगादीवर बसवण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर राजगादीवरून होणारा संघर्ष टाळण्यासाठी पांडवांना  इद्रप्रस्थात राज्य स्थापन करण्याची परवानगी काळजीवाहू राजा धृतराष्ट्राने पांडवांना दिली होती. त्यानुसार पांडवांनी इंद्रप्रस्थाचे राज्य स्थपनही केले. दिवसेंदिवस पांडवांचे राज्य लोकप्रियही झाले.
हस्तिनापूर राजसिंहासानार धृतराष्ट्र हंगामी को होईना राजा होता खरा, परंतु इंद्रप्रस्थ राज्याच्या स्थापनेपासूनची १६ वर्षे आणि पांडवांच्या वनवास काळातली १३ वर्षे अशी मिळून २९ वर्षे हस्तिनापूरची खरीखुरी सत्ता राजपुत्र दुर्योधनाच्या हातात होती! तो स्वतःला हस्तिनापूरचा राजा समजत असे! धृतराष्ट्राला मात्र स्वतःला राज्याधिकारासंबंधी संशय होता. मी  अंगविहीन असल्याने राजसिंहासनावर मुळात बसूच शकत नव्हतो. वस्तुतः ह्या राज्यावर पांडुचाच अधिकार होता. त्याच्या मृत्यूनंतर राज्यावर पांडुपुत्राचाच खरा अधिकार आहे, मी राज्याचा अधिकारी नव्हतो. म्हणून राजाही नाही. तूही राजपुत्र नव्हेस. तू राज्यकारभार पाहून दुसच्याचा धनाचा अपहार करत आहेस.  द्युताच्या अटीनुसार त्याने वनवास भोगला. तरी, इंद्रप्रस्थाचे द्युतात जिंकलेले राज्य तू पांडवांना परत कर आणि सुखी हो असे धृतराष्ट्राने दुर्योधनाला परोपरीने सांगितले. पण दुर्योधन पित्याचे ऐकायला तयार नव्हता. धृतराष्ट्राच्या मनात राजा नसल्याची खंत जरूर होती, परंतु त्याची न्यायबुध्दी वरचेवर उफाळून येत होती हेही तितकेच खरे आहे. हस्तिनापूरच्या गादीवर राजाच नसल्याने कुरूंचे राज्य हे सुसंघटित अराजकच होते! सद्यकालीन घटनात्मक भाषेत Null and void होते!
विराट राज्यातला अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी राज्य मिळवण्यासाठी युध्दाची तयारी सुरू होती. एकीकडे युध्दाची तयारी सुरू असताना दुसरीकडे सामोपचाराचा बोलणीही सुरू केली. कृष्णाला कौरव दरबारात शिष्टाईसाठी पाठवणे हा सामोपचाराचाच भाग होता. दूत ह्या नात्याने कृष्ण कौरव दरबारात बोलणी करण्यासाठी गेला होता. आपल्या शिष्टाईचा काही उपयोग होणार नाही ह्याची कृष्णाला पुरेपूर कल्पना होती. तरीही व्यापक राजकारणाचा भाग म्हणून तो शिष्टाईसाठी गेला. त्यावेळी त्याने कौरव दरबारात अतिय़स प्रभावी भाषण करून पांडवांना अर्धे कौरव राज्य मिळावे अशी मागणी केली. दुर्योधनाने ती फेटाळून लावली. पांडवांबरोबर तडजोड करण्याची संधी दुर्योधनाने गमावली. इतकेच नव्हे, तर राजशिष्टाचार बाजूस सारून कृष्णाला अटक करण्याची तयारी दुर्योधनाने चालवली. कृष्णाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याची दुर्योधनाची योजना प्रत्यक्षात आली असती तर त्याक्षणीच हस्तिनापुरातच युध्द पेटले असते!
कौरव दरबारात जाणारा कृष्ण हाच काही पहिला दूत नव्हता. त्याआधी विराट राजाच्या पुरोहिताला कौरव दरबारात द्यूत म्हणून पाठवण्यात आले होते. कृष्ण ज्याप्रमाणे पांडवाचा दूत म्हणून कौरव दरबारात गेला त्याप्रमाणे कौरवांनीही मंत्री संजयला विराटाच्या दरबारात पाठवले होते. दूत ह्या नात्याने संजयानेहीदेखील त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पडली. त्याने राज्य वगैरै विसरून जाऊन पांडवांनी कौरन दरबाराची सेवा करावी अशी कौरव दरबाराची भूमिका विराटाच्या दरबारात भक्कमपणे मांडली होती. ह्या पार्श्वभूमीवर असे वातावरण तयार झाले की हस्तिनापूरचे राज्य कुणाचे ह्या प्रश्नाचा निकाल केवळ युध्दानंतरच लागू शकतो. एकूण घ़नाक्रम पाहता १८ दिवसांचे युध्द अटळ ठरले होते. भीमावर विषप्रयोग, शस्त्रास्त्र स्पर्धेच्या वेळी कर्णाचा अपमान, पांडवांना लाक्षगृहात जाळणे, द्यूतसमयी दौपदीची विंटबना, पांडवांना निष्कारण १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास, दुर्योधनाची मांडी फोडण्याची भीमाची प्रतिज्ञा ह्यासारख्या व्यक्तिसापेक्ष कारणांवरच जनमानस भर दिला गेला. अर्थात त्यामुळेच पाच हजार वर्षे उलटली तरी महाभारताच्या लोकप्रियतेत फरक पडला नाही. जनमानसात महाभारताची गोडी कायम राहिली. धर्मराज मुळात सर्वस्वान्त करणारा द्यूत खेळलाच का?  बरे खेळला तर खेळला, नैव -हस्वा न महतो नातिकृष्णा न रोहिणी सरागरक्त नेत्रा द्रौपदीला पणाला का लावलेच का असा रोकडा सवाल करणारे बुध्दिवादी लोक भारतात पूर्वीही होते. आजही आहेत!  परंतु पाच हजार वर्षांपूर्वीच्या काळात राजेसंडळीत द्यूत मुळीच निषेधार्ह नव्हते. नल राजानेदेखील द्यूतात राज्य गमावले होते!
द्यूतासंबधी खुद्द कृष्णाचे मत काय होते हे अनेकांना माहित नाही. कौरव-पांडवात झालेले द्युत हे द्यूतविषयक संकेतांची पायमल्ली करणारे होते. ज्या राजाशी द्यूत खेळायची इच्छा होते त्या राजाच्या दरबारात द्यूतेच्झूने स्वतः गेले पाह्जि असा द्यूतक्रिडेचा मह्त्त्वाचा संकेत आहे. द्यूत खेळण्यासाठी युधिष्ठराला हस्तिनापूरच्या दरबारात निमंत्रित करणे हा द्यूतविषयक नियमांचा उघड उघड भंग झाला होता. दुसरे म्हणजे राजाने द्यूत स्वतः खेळे पाहिजे असाही द्यूताचा संकेत होता. दुर्योदनाच्या वतीने शकुनीने द्यूत खेळणे हाही द्यूतविषयक नियमांचा भंग होता. स्वतःला द्युतात पणास लावून हरल्यानंतर द्रौपदीस पणाला लावण्याचा खरे तर युधिष्टराला अधिकार उरला नव्हता. नेमका हाच मुद्दा द्रौपदीने तिला दरबारात आणण्यात आल्यानंतर उपस्थित केला. तिचा मुद्दा बिनतोड होता. निरूत्तर झालेल्या भीष्माला खाली मान घालण्यावाचून पर्याय नव्हता. कारण, तो कौरव दरबाराचा अधिकारशून्य स्वयंघोषित सेवक होता. द्रोणाचार्य तर स्वतःला भिष्माचे अंकित समजत होते. त्यामुळे द्युतात हस्तक्षेप करण्याचा दोघांना ही अधिकार नव्हता. जेव्हा कौरव दरबारात द्यूतक्रीडा झाली तेव्हा कृष्ण कुठल्या तरी लढाईवर गेला होता. त्याला जेव्हा द्युताची हकिगत समजली तेव्हा मी हजर असतो तर द्यूत होऊच दिले नसते असे उद्गार त्याने काढले अशा आशयाचा श्लोक महाभारतात आहे.
महाभारत युध्दाची कारणपरंपरा काहीही असो! महाभारतास ५ हजार वर्षे उलटली तरी महाभारत काव्यात रेखाटण्यात आलेल्या सा-या व्यक्तिरेखा आजही कवी, लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्वज्ञ-संतांना आव्हान ठरल्या आहेत. प्रसारमाध्यमात झालेल्या क्रांतीनंतरही महाभारताची लोकप्रियता वाढत असल्याचे बी आर. चोपडानिर्मित आणि रवि चोपडादिग्दर्शित महाभारत मालिकेने दाखवून दिले. महाभारतावर अनेक सिनेमेही निघाले आहेत. तेही प्रेक्षकांना आवडले. विशेष म्हणजे पीटर्सने महाभारतावर इंग्रजी सिनेमा काढला. ह्या सिनेमाचे मुंबईत फक्त ४ शो झाले. त्याचे स्क्रीप्ट पुस्तकरूपाने उपलब्ध आहे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: