Friday, April 10, 2020

शिस्त पाळा, राजकारण टाळा!

एकीकडे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र दिसते तर दुसरीकडे राजकारण्यांच्या जमातीसकट जनतेत दिसून येणारी बेशिस्त रोखण्यात मात्र आलेल्या अपयशाचे चित्र दिसते. येस बँक आणि दिवाण हौसिंगशी संबंधित गुन्हेगारीच्या सदरात मोडणारी कारस्थाने करणा-या कपिल वधवा कंपूल महाबळेश्र्वर प्रवास करण्याची लेखी परवानगी देणारे गृहखात्याचे खास सचिव अमिताब गुप्ता ह्यांना घरी बसवण्याची कठोर कारवाई महाराष्ट्र सरकारला करावी लागली ह्यात सगळे आले. वधवा कंपूला परवानगी देणा-या राष्ट्रवादीकडे अंगुलीनिर्देश करण्यास भाजपा नेते कोरोना संकटाच्या काळातही विसरले नाही. वस्तुस्थिती विपरीत असती तर गृहसचिवासारख्या उच्च पदस्थाला रजेवर पाठवण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी केले नसते!
भाजी आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याची जबाबदारी प्रत्यक्षात घाऊक बाजारावर असते. कोरोना संकटाच्या काळात माल घेण्यासाठी झुंबड करायची नसते हे काही छोट्या व्यापा-यांच्या समजले नाही. समजले तरी उमगले नाही. गर्दी होऊ नये म्हणून शेवटी बाजारच बंद करण्याची पाळी अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनावर आली. कोरोनाविरूध्द सुरू असलेल्या लढाईचे हे दुर्दैवी अपयशच म्हणावे लागेल. अर्थात ते तात्कालिक असले तरी अपयश हे अपयशच. ठाणे, मुंबई आणि पुणे ह्या शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. गर्दी हे त्याचे प्रमुख कारण आहे.
मलेरिया आणि न्यूमोनियाच्या आजारावर उपचार करण्यासाठी लागणा-या गोळ्यांचा भरपूर साठा असून काळजी करू नका असे आश्वासन आरोग्य सचिव लव आगरवालनी व्हिडिओ पत्रपरिषदेत पत्रकारांना दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही औषधे केव्हा द्यावीत हे डॉक्टरमंडळी ठरवतात. कोरोनाग्रस्तांचे रूग्ण वाढत असले तरी कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही समाजव्यापी झालेला नाही. साथ पसरण्याचा टप्प्यापर्यंत पोहचलेला नाही ह्याचीही ग्वाही त्यांनी दिली. कोरोनाची लागण सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाची असल्याचा फरक त्यांनी लक्षात आणून दिला आहे. कोरोनाचे संशयित रूग्ण, लागण झालेले रूग्ण आणि कोरोनाबळींची आकडेवारी ते दररोज देत आहेत. कालपासून त्यांनी कोरोनारूग्णाच्या प्रकृतीबद्दल तारतम्य बाळगले जाते हे स्पष्ट केले. करोनाबाधितांच्या चाचण्या मात्र वाढवण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पहिल्या तपासणीपासून ते पॅथालॉजी लॅबची वाढीव संख्येबद्दल वक्तव्य करताना आगरवाल ह्यांनी कुठेही घोळ घातलेला नाही. तपासणी किटस् आणि जनतेसाठी मास्कचा पुरवठा वाढला असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.  
तपासणी किट्स हातात पडताच मुंबईतील आयएनएस अश्विनी ह्या नौदलाच्या इस्पितळातील सर्व शाखांच्या पदव्युत्तर वर्गाचे सारे विद्यार्थी आपल्या शाखेचा अभ्यस बाजूला ठेऊन कोरोना रूग्णांची तपासणी करण्यासाठी पुढे सरसावले. राज्यातल्या अनेक सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते त्यांच्या परीने कामास लागल्याचे मेधा कुळकर्णींच्या पोस्टवरून दिसले. विधायक काम करणा-यांचे कौतुक केलेच पाहिजे.
महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश ह्या राज्यात राजकारण तर पाचवीला पूजलेले आहे. राजकारणाची गोडी रक्तात भिनली की सेवाभावाचा संबंध संपुष्टात येतो. मोबाईलवर मिसकॉल देऊन सभासदत्व   स्वीकारणा-या राजकीय कार्यकर्त्यांची ही पिढी! सेवाभानव त्यांच्याकडून अपेक्षित नाहीच. गर्दी हे ह्या मोठ्या शहरांचे अभिन्न अंग. सोशल डिस्टटिंगच्या मार्गात गर्दी हाच मोठा अडथळा! एखादी बरीवाईट घटना घडल्यानंतर चूक कुणाची ह्याची चौकशी करत बसण्यापेक्षा प्रत्येकाने जमेल तितके विधायक काम केले पाहिजे. ते करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. आपल्या इमारतीतल्या शेजा-याला, वस्तीतल्या ओळखीच्या माणसाला, गावातल्या वृध्दांना जमेल तेवढी मदत केली पाहिजे. विधायक कार्य केवळ संस्थात्मक पातळीवरच करता येते असे मुळीच नाही. ते वैयक्तिक पातळीवरही करता येते! कोरोनाचा प्रसार वाढला तर कोणाच्या हातात काही उरणार नाही. जीवनाचा अवघा पसारा अर्थशून्य होऊन बसेल!
शिस्त पाळा, राजकारण टाळा!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार


No comments: