Friday, April 3, 2020

झपाटलेला लेखकः राही मासूम रजा

सध्या दूरदर्शनवर पुनःप्रसारित होत असलेल्या महाभारत मालिकेच्या संवादलेखनाची जबाबदारी राही मासूम रजा ह्यांनी घ्यावी म्हणून बी. आर. चोपडांनी त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा संवादलेखनाची जबाबदारी घेण्यास रजांनी चक्क नकार दिला होता! नकार देताना भाव खाण्याचा त्यांचा हेतू मात्र मुळीच नव्हता. बी. आर चोपडांसाठी रजांनी अनेक सिनेमांच्या पटकथा- संवाद लिहले होते. ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ ह्या राज खोसलानिर्मित चित्रपटाला रजांना संवादलेखनाचा फिल्म फेअर अवार्ड मिळाला होता. बी. आर. चोपडांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या अनेक चित्रपटांचे लेखन रजांनी केले होते. ते हिंदी आणि उर्दूतले प्रसिध्द लेखक होते. त्यांच्या हातात सतत कुठले ना कुठले लेखनाचे काम असायचे. बी. आर. चोपडांनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांच्या हातात कुठले तरी पुस्तकाचे काम होते. म्हणून मालिकेचे संवाद लिहायला माझ्या हातात आता वेळ नाही असे उत्तर त्यांनी चोपडांना दिले. पण चोपडांनी त्यांना गळ घातल्यावर संवाद लिहून देण्याचे त्यांनी मान्य केले!
गंमतीचा भाग म्हणजे ‘मैं समय हूं ‘ ह्या वाक्याने सुरू होणा-या महाभारत मालिकेने देशभराच्या प्रेक्षकांचे ह्रदय काबीज केले तेव्हा हिंदीतील प्रतिष्ठित लेखकांच्या पोटात पोटशूळ उठला. महाभारताचे संवाद लिहायला बी. आर. चोपडांना काय मुसलमान लेखकच सापडला का, असा खोचक सवाल एका स्वयंमन्य लेखकाने जाहीररीत्या विचारला! रजा हे मुस्लिम असले तरी ते सूफी संप्रदायाचे होते. उत्तरप्रदेशात गाजीपूर जिल्ह्यात गंगेच्या काठावरील गंगौली नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून त्यांना गंगेचे विलक्षण आकर्षण होते. गंगा, गोविंद आणि गीता ही हिंदूधर्माची वैशिष्ट्यत्रयी आहे हे त्यांना माहित होते. लहानपणापासून गंगेशी त्यांचे भावनिक नाते होते. ते स्वतःला गंगापुत्रच समजत. म्हणूनच की काय, महाभारतातील संवादात त्यांनी देवव्रत भीष्माचा उल्लेख नेहमीच ‘गंगापुत्र’ असा केला!
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात हिंदी साहित्यात त्यांनी पदवी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी साहित्यात डॉक्टरेटही केले. हिंदी भाषा आणि साहित्याचा अभ्यास करता करता ते हिंदुस्थानी संस्कृतीच्या  प्रेमात पडले. पद्व्युत्तर शिक्षणानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठात त्यांची नेमणूक प्राध्यापकपदावर नियुक्तीही झाली. दरम्यानच्या काळात त्यांनी हिंदी आणि उर्दू ह्या दोन्ही भाषेत लिहायला सुरूवातही केली होती. अल्पावधीतच ‘आधा गाव’, ‘दिल एक सादा कागज’, ‘टोपी शुक्ला’ वगैरे त्यांची हिंदी पुस्तके गाजली. उर्दू पुस्तके लिहण्याचाही त्यांनी झपाटा लावला. १९७७ पासून हिंदी सिनेमाच्या पटकथा-संवाद लेखनाची कामे त्यांना मिळू लागली. आलाप, गोलमाल, जुदाई, हम पंछी, अनोखा रिश्ता, बात बन जाये, लम्हे इत्यादि चित्रपटांचे संवाद त्यांनी लिहले. संवाद लिहण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणनच बी. आर. चोपडांनी त्यांना जवळ जवळ धरूनच ठेवले.
महाभारताचे संवाद लिहण्यासाठी फोनवर बोलून बी. आर. चोपडांनी त्यांना पत्र धाडले. केवळ बी. आर. चोपडांचा शब्द मोडू नये म्हणून महाभारताचे संवाद लिहण्याचे त्यांनी मान्य केले. महाभारत मालिका सुरू झाली तेव्हा मालिकेचे रेटिंग तुफान वाढले. महाभारताचे वैशिष्ट्य म्हणजे महाभारताचे संवाद कानावर पडताच दुस-या खोलीत बसलेली माणसे हातताले काम सोडून टी. व्ही. पाहायला लगेच हजर होत. संवादाचे सामर्थ्य फारच क्वचित मालिकात पाहायला मिळाले आहे. रजांच्या संवादांचे वैशिष्ट असे की ते कधी काव्यात्म रूप घेतात तर कधी भावव्याकुळ स्वरात ते बाहेर पडतात. पात्रानुसार संवादांचे स्वरूप बदलत जाते. तार्किक विश्लेषणातही ते मागे पडत नाहीत. मुळात महाभारतातले श्लोक गोळीबंद आहेत, अर्थगर्भ आहेत. ते वैशिष्ट्य संवादात कायम ठेवण्यात रजांना कमालीचे यश मिळाले.
राही मासूम रजांनी ( १९२५ ते १९९२ ) ‘छोटे आदमी की बडी कहानी’ हे आत्मचरित्रही लिहीले. वाचकांशी जणू संवाद साधल्यागत ते लिहतात. प्रामाणिक आत्मकथनामुळेही त्यांचे आत्मचरित्र खूपच गाजले. पदव्युत्तर शिक्षणानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठात अध्यापन आणि लेखन अशी दोन्ही प्रकारे त्यांची वाटचाल सुरू होती. कोणतेही काम करताना कठोर परिश्रम करावे लागतात हे त्यांना मान्य होते. तशी त्यांच्या मनाची तयारीही होती. म्हणूनच एक झपाटलेला लेखक अशीच त्यांची प्रतिमा हिंदी साहित्यात तयार झाली होती.
रमेश झवर
 ज्येष्ठ पत्रकार

No comments: