Thursday, April 30, 2020

महाराष्ट्र सुसंपन्न होओ!


आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६० वर्षें पुरी झाली. मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, ब-हाणपूर  ह्यांचा महाराष्ट्रात समावेश असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावे म्हणून समितीने उभारलेले आंदोलन पाहाता पाहता राज्यव्यापी झाले. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून गुरातच्या नेत्यांनी काँग्रेसवर दबाव आणला होता. त्या दबावाला पं. जवाहरलाल नेहरू बळी पडले! भाषावार प्रांत रचनेच्या तत्त्त्वानुसार देशभरात भाषावार प्रांत स्थापन झाले. महाराष्ट्र मात्र अपवाद ठरला. मुंबई माहाराष्ट्राला मिळू नये म्हणून गुजरात आणि महाराष्ट्र असा व्दिभाषिक राज्याचा घाट घालण्यात आला. त्यानुसार नेहरूंनी महाराष्ट्र आणि गुजराता अशा व्दिभाषिक राज्याची स्थआपना केली. हा मराठीभआषकांवर उघड उघड अन्याय होता. व्दिभाषक मुंबई राज्याचे मोरारजी देसाई मुख्यमंत्री झआले. आंदोलन चिरडून काढण्यासाठी मोरारजींनी कसोशीने प्रयत्न केले. फ्लोरा फाऊंटन भागात आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात १०५ मराठी माणसे ठार झाली. गोळीबाराच्या घटनेमुळे आंदोलन शमले तर नाहीच उलट, अधिक तीव्र झाले. देशभर लोकप्रिय असलेले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ह्यांच्या लोकप्रियतेला महाराष्ट्रात ओहोटी लागली. ठिकठिकाणी नेहरूंचे काळ्या झेंड्यांनी स्वागत झाले. थोडी कळ काढा, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी मी नेहरूंचे मन वळवीन अशी भाषा त्या काळात यशवंतराव चव्हाणांची होती. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करताना कम्युनिस्ट पक्ष काँग्रेसपेक्षा प्रबळ होऊ नये एवढेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र होते. ऐन चळवळीच्या काळात झालेल्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला विधानसभेत शंभरहून जास्त जागा मिळाल्या. मुंबई महापालिकेत तर संयुक्त महाराष्ट्र समितीची सत्ता आली. तरीही महाराष्ट्रातल्या राजकारणाला संघर्षाचे वळण लागले तरी दाक्षिणात्य राज्यातल्या वळणाइतके ते गंभीर नव्हते. महाराष्ट्राने काँग्रेसला विरोध केला, नेहरूंना विरोध केला! पण हा विरोध मुद्द्यापुरताच होता. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या मागणीपुरताच होता! विरोध करताना महाराष्ट्राची विवेकबुध्दी कधी सुटली नाही. ह्या संयमी विरोधाची दखल शेवटी नेहरूंना घ्यावीच लागली. इंदिराजींना महाराष्ट्रासंबंधी, महाराष्ट्रातल्या लोकभावनांविषयी अहवाल सादर करण्यास काँग्रेसने सांगितले. इंदिराजींनी महाराष्ट्राचा दौरा करून महाराष्ट्राची मागणी न्याय्य असल्याचा अहवाल दिला. काँग्रेस कार्यकारिणीने तो स्वीकारला. महाराष्ट्र राज्यनिर्मितीसाठी केंद्राची चक्रे फिरली. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले! कालान्तराने
फ्लोरा फाऊंटनला हुतात्मा स्मारक झाले. ह्या भागाचे हुतात्मा चौक असे नामकरणी करण्यात आले. महाराष्ट्राच्या  लढ्याची सूत्रे वरळीतील शिवशक्ती ह्या मराठा दैनिकाच्या कार्यालयातून हलत होती. त्या काळात मराठाच्या संपादक मंडळात आचार्य अत्रे ह्यांचे निकटवर्ती असलेले चीफ सबएडिटर वसंत देशपांडे ह्यांनी माझ्या विनंतीवरून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना लेख लिहला. तो लेख मुळात वाचण्यासारखा आहे. म्हणून तो लेख माझ्या संकेतस्थळावर अतिथी पानावर दिला आहे. अवश्य वाचा!
 वसंत देशपांडे ह्यांचा लेख- संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
 (  लिंक- https://wp.me/PaK76Y-8A  )

महाराष्ट्र सुसंपन्न होओ अशी य़ुभेच्छा देत असताना देशभरातील प्रत्येक नागरिकाला मनात केंद्राच्या हडेलहप्पीबद्दल चिंता वाटते. देशाला फेडरलिझम मान्य आहे. पण तथाकथित अ. भा. पक्षाच्या नावाखाली फ्युडलिझम मात्र मान्य नाही. आजवर महाराष्ट्राने विनम्रता कधीच सोडली नाही. केंद्रात अनेकदा सत्तापालट होऊही केंद्रातले मंत्री मात्र त्यांचा तोरा सोडायला तयार नाहीत. तोरा मिरवण्याच्या केंद्रीय नेत्यांच्या मनोवृत्तीमुळे देशाच्या लोकशाही प्रवासास अडथळे उत्पन्न होऊ शकतात ह्याचे भान केंद्रीय सत्ताधा-यांनी बाळगणे आवश्यक आहे.

रमेश झवर ज्येष्ठ पत्रकार

  
 ह्या संकेतस्थळाला अवश्य भेट  द्या-      https://wp.me/PaK76Y-8A





No comments: