राजसिंहासनावर अधिकार कोणाचा ह्यावरून महाभारत युध्द उद्भवले हे खरे आहे.
अर्थात् युध्दविषयक कारणासंबंधीच्या प्रश्नाचे ते फारच ढोबळ उत्तर झाले. १८ दिवस
चाललेल्या ह्या युध्दात १८ अक्षौणी सैन्य ठार झाले. ५ पांडव, कृष्ण, सात्यकी आणि
अश्वत्थामा हे ८ जण वगळता ह्या युध्दात भाग घेतेलेले सारे राजे मारले गेले. महाभारताच्या
अंगोपगांचे दर्शन घडवण्यात आणण्यात अनेकांनी केले तरी महाभारतातल्या राजकारणाचे
तपशीलवार दर्शन मात्र कमी लेखकांनी घडवले आहे.
महाभारताच्या राजकारणाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा महाभारत काळी
द्युत खेळणे सिंहासनाधिष्ठित राजे लोकात पूर्णपणे शिष्टसंमत मानले जात होतेहे
लक्षात ठेवले पाहिजे. अटीतटीच्या द्युताची प्रतिक्रिया पुन्हा काही काळानंतर
पुन्हा द्युत खेळून व्यक्त होत असे. किंवा युध्दानेही ह्या प्रतिक्रियेला
पूर्णविराम मिळत असे. नलदमयंती आख्यानात नलाने बंधूबरोबर पुन्हा द्यूत खेळून
हरलेले राज्य पुन्हा जिंकल्याचे उदाहरण महाभारतातच आले आहे. द्यूतात विजयी झाला
म्हणून नलराजा पुन्हा राजसिंहासनावर बसला. कौरव दरबारात झालेल्या द्युतात पांडव
राज्य गमावून बसले. द्रौपदीचा विटंबना झाली.
हे द्यूत खेळू दिली ह्यात आपले काही तरी चुकले अशी जाणीव सिंहासनाधिष्ठित
महाराज धृतराष्ट्राला झाली. पण त्याला फार उशीरा झाला. आधी खेळलेले सर्व डाव रद्द
करून त्याने परत गेलेल्या पांडवाना पुन्हा एकच डाव खेळायला या असा निरोप पाठवला.
नंतरच्या डावात पांडव पुन्हा एकदा हरले! दुर्दैवाने राज्य परत मिळवण्याऐवजी १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास
पत्करण्याची पाळी पांडवांवर आली.
बी. आर. चोपडांच्या महाभारतात विदूर आणि भीष्म ह्यांनी उठून द्यूत
थांबवण्याची मागणी केल्याचे दाखवले आहे. त्यात नाट्य आणण्यासाठी चोपडांनी युधिष्ठिराचा
यथेच्छ उपाहास करणारे संवादही शकुनीच्या तोंडी टाकले. त्यामुळे महाभारताची रंगत
निश्चितपणे वाढली. अनेक लेखकांप्रमाणे चोपडांनीही महाभारत तयार करताना कला
आविष्काराचे स्वातंत्र्य भरपूर उपभोगले. परंतु द्यूत क्रिडेमागचे भडक राजकारण चोपडांनी
बरोबर दाखवले. द्यूतास घेण्यात आलेला आक्षेप मात्र एकदाच घेण्यात आलेला दाखवला.
युधिष्ठिरमहाराज स्वतः हरलेले असताना मला पणास लावण्याचा त्यांना अधिकारच कसा
पोहचतो असा आक्षेप दौपदीने घेतला. तो बरोबरही आहे.
वास्तविक कौरव दरबारात झालेल्या द्युतात द्यूतविषयक सर्व संकेतांना फाटा
देण्यात आला होता. ज्याच्याशी द्यूत खेळायचे त्याच्या दरबारात द्यूत खेळू
इच्छिणा-याने हजर व्हायला पाहिजे असा संकेत आहे. हा संकेत कुरू दरबारात झालेल्या
द्युतात पाळला गेला नाही. पांडवांचा आदर सत्कार करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले
होते. दरबारात त्याप्रसंगी मनोरंजनासाठी द्यूत वगैरेही खेळले जाईल, असा निरोप पांडवांना
देण्यासाठी धृतराष्ट्राने मुद्दाम महामंत्री विदुराची निवड केला. विदुराला धृतराष्ट्राने
इंद्रप्रस्थला पाठवले होते. युधिष्ठिर हा इंद्रप्रस्थ राज्याचा सिंहासनाधिष्ठित
राजा होता. द्यूत हे समसमान राजाशी खेळायचे असते ह्या तत्त्वानुसार युवराज दुर्योधनाशी
द्यूत खेळायला त्याने नकार द्यायला हवा होता. यूत खेळायचेच होते तर त्याने ते फक्त
धृतराष्ट्राशीच खेळायला हवे होते. युवराज दुर्योधनाशी नाही. हा द्युतसंबंधीच्या
तत्कालीन संकेतांचा उघड उघड भंग होता.
द्युतात हरलेल्या संपत्तीवर कोणाचाच अधिकार असत नाही. त्यानंतर द्रौपदीची
भर दरबारात विटंबना झालेली, इंद्रप्रस्थाचे राज्य डावात हरल्याने वनवास आणि
अज्ञातवास पत्करण्याची पाळी पांडवावर आली हे पाहून, खरे तर, धृतराष्ट्र मनातल्या
मनात पार हादरून गेला. पांडव राजसभेतून निघून गेल्यावर उशिरा का होईना द्युताचे हे
डाव रद्दबातल ठरवण्याची बुध्दी धृतराष्ट्राला झाली. आधी खेळले गेलेले डाव त्याने रद्द केले.
युधिष्ठिराला पुन्हा एक डाव खेळण्याची संधी मिळावी म्हणून त्यांना परत बोलावण्याचा
हुकूम धृतराष्ट्राने दिला. विशेष म्हणजे काकांची आज्ञा मान्य करून युधिष्ठिर
बंधूंसह दरबारात पुन्हा हजर झाला.
द्यूत खेळले जात असताना कौरव दरबारात द्युताचे ५ जाणकार हजर होते. परंतु
पाची जणांनी झालेल्या द्युताबद्दल
अवाक्षरही काढले नाही! म्हणजे दरबारातले
द्यूत दबावाखाली झाले. म्हणूनच ते द्यूत ‘कपट द्यूत’ म्हणून ओळखले गेले! ह्या द्युताची
हकिगत श्रीकृष्णाला जेव्हा समजली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, मी तेथे उपस्थित असतो
तर हे द्यूत जबरदस्तीने थांबवले असते. तशा आशयाचे श्लोक महाभारतात आले आहेत. सर्वस्वान्तकारक द्युतात युधिष्ठिर
सुरूवातीला १८ डाव हरला. १९ व्या डावात त्याने स्वतःला सावधपणे पणाला लावले. कदाचित् द्युताचा शेवट अटळपणे युध्दात होणार ह्याची
कल्पना युधिष्ठिरला आली असावी! स्वतः हरल्यावर चारी भावांना पणाला लावण्याचा त्याला अधिकार नाही हे
युधिष्ठिरच्या लक्षात आले नसेल असे नाही. परंतु सात्विक अहंकाराच्या आहारी
गेल्याने युधिष्ठिरला सत्य उमगले नाही असे म्हणता येईल. शकुनीच्या सुचनेनुसार
त्याने द्रौपदीलाही पणाला लावले! दौपदीला दरबारात आणण्यासाठी सेवकाला पाठवले तेव्हा मला पणास लावण्याचा
युधिष्ठिरला अधिकार नाही;
कारण तो स्वतःच
हरलेला आहे असा मुद्दा द्रौपदीने उपस्थित केला! त्याखेरीज
युधिष्ठिर स्वतः द्युतात हरल्याने पत्नी ह्या नात्याने द्रौपदी आपोआपच दासी झाली
होती. ती दासी झाली तरी युधिष्ठिराची पत्नी ह्या नात्याने तिचे स्वतंत्र स्थान
अबाधित राहिले असते. पतीविना ती आयुष्य सहज जगू शकली असती.
कौरव दरबारात हा अनर्थ घडत असताना भीष्मपितामह गप्प का बसले हा प्रश्न आजच्या
काळातले विद्वान विचारतात. परंतु प्रतिज्ञाबध्द असल्याने राजदरबारातल्या कुठल्याही
बाबीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार भीष्मपितामहांनी स्वतःहून सोडला होता.
द्रोणाचार्य तर स्वतःला भीष्माचा अंकित समजत असल्याने दरबाराच्या कामकाजात भाग
घेण्याचा त्यांना मुळातच अधिकारच नव्हता. दरबारात घडणा-या घटनांची दखल
कृपाचार्यांनी घेतली नाही असा आक्षेप घेतला गेला. तोही अधिकारहीनच होता.
दरबारी चालीरीतींच्या अनभिज्ञतेमुळे सृजनशील द्यूत क्रीडेचा अर्थ लावताना
कीर्तनकार, कवी, कथेकरी बुवा ह्या सगळ्यांनी राजकीय मुद्द्यांकडे अजिबात लक्ष दिले
नाही. अर्थात तसे ते देण्याचे त्यांना कारणही नाही. मानवी स्वभावाच्या विविध पैलेच
मनोज्ञ दर्शन घडवणे हाच त्यांचा प्रांत! प्रसंग रसभरित वाणी-लेखणीने रंगवून जिवंत प्रसंगचित्र उभे करणे हेच
त्यांच्या प्रतिभेचे सारगर्भ सामर्थ्य. युध्द का अपरिहार्य ठरले ह्याची मीमांसा
त्यांच्याकडून अपेक्षित नाही. कृष्णशिष्टाईचा प्रसंग वगळला तर द्यूत, धृतराष्ट्राचा
दूत ह्या नात्याने संजय आणि दुर्योधनाचा दूत म्हणून उलूक ने बजावलेली कामगिरी इत्यादींकडे
लेखक-कलावंतांनी गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही.
रमेश झवर
( भग्वद्गितेचे लक्ष् कोण ह्या द. ल. शिवलकरलिखित पुस्तिकेवर हा लेख
आधआरित आहे. )
No comments:
Post a Comment