Thursday, April 16, 2020

हा तर देशद्रोहाचा गुन्हा


एक माणूस उठतो आणि सरळ लोकांना बांद्रा स्टेशनवर जमा होण्याचे आवाहन करतो! लोकही मेंढरासारखे त्याच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देतात. म्हणता म्हणता हजारो माणसे तेथे जमतात. ह्या सगळ्या लोकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी हर प्रकारे मदत करण्याचे आश्वासन त्या माणसाने दिलेले असते.   वास्तविक त्याच दिवशी संचारबंदी आणि लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केलेली असते. पंतप्रधानांच्या घोषणेच्या थोडे आधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी कम् टाळेबंदी वाढवण्याची घोषणा केलेली असते. तरीही बांद्र्यात जमाव एकत्र आलेलाच असतो. शेवटी जमावाला पिटाळून लावण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. हे सगळे ठरवून घडवून आणले जात असेल तर त्यामागे योजनाबध्द कट असल्याचा निष्कर्ष नाइलाजाने काढावा लागेल. जमावाला पिटाळून लावण्यात जरी पोलिस यशस्वी झाले असले तरी ज्यासाठी जमावबंदी, संचारबंदी किंवा टाळेबंदी जारी करावी लागली त्या कोरोनाचा फैलाव होण्यास ही घटना कारणीभूत ठरणारच नाही हे निश्चितपणे कसे सांगता येईल?
अर्थात बेरोजगार झालेले लाखो मजूर निराश झालेले आहेत. त्यांना रोजगार तर नाही. खायला अन्न मिळवण्याची मारामार. त्यांना पगार द्या असे आवाहन सरकारकडून करण्यात आले असले तरी फुकट खाण्याची अनेकांची नियत नसते असा अनुभव आहे. हे लोक फआरसे शिकलेले नाही हे खरे; पण अडाणीही नाहीत. त्यामुळे ह्यांना कोणी झुलवले असेल आण तेही झुलले असतील तर त्यात त्यांची फार मोठी चूक झाली असे म्हणता येणार नाही. उलट संचारबंदी कम् टाळेबंदीचे उल्लंघन करून त्यांना एकत्र जमण्याचे आवाहन करणारा मात्र अट्टल गुन्हेगार आहे.    
हजारो लोकांना झुलवणारा कोण आहे हा उपदव्यापी इसम?  विनय दुबे नामक ह्या इसमाने कल्याण मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्याविरूध्द निवडणूक लढवली होती. त्यापूर्वीही उत्तरप्रदेशातही म्हणे त्याने विधानसभेची निवडणूक लढवली होती. तो मुंबईत केव्हा आला? नवी मुंबईत तो वास्तव्यास केव्हा गेला? तो नेमका काय उद्योग करतो? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढणे पोलिसांना मुळीच अवघड नाही. पोलिसांना आतापर्यंत समजलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून हा स्वयंघोषित पुढारी समाजमाध्यमातून लोकांना त्यांच्या मूळ गावी पोहचता यावे म्हणून आंदोलन सुरू करण्याची भाषा करत होता. १८ एप्रिलपर्यंत उत्तरप्रदेशातल्या मजुरांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था सरकारने केली नाही तर देशव्यापी आंदोलन छेडण्याचे त्याने जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागचापुढचा विचार न करता लॉक़डाऊनची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला असाही आरोप त्याने केला. १४ तारखेला गाड्या सुरू करण्याचीही मागणी त्याने केली होती.
जमावाला पिटाळून लावण्याची पोलिस कारवाई लगेच सुरू झाली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बांद्राच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्याशी बोलणे केले होते. त्यांचे काय बोलणे झाले हे कळण्यास मार्ग नाही. परंतु गावी परत जाणा-यांचा अशाच प्रकारचा जमाव सुरत येथेही जमल्याचा व्हिडिओ एबी माझाने प्रदर्शित केला. लॉकडाऊननंतर देशातल्या अन्य भागातही पोलिस विरूध्द जमाव अशा चकमकी उडाल्याची दृश्ये पाहायला मिळाली. पोलिसांवर हल्ला होण्याची प्रकरणे तर फारच गंभीर आहेत. ह्या सगळ्याचा अर्थ देशभरात समाजविघातक शक्ती सरकारविरूध्द कंबर कसून उभ्या राहिल्या आहेत असा होतो.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार ह्यांच्यासह अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना पाठिंबा दिला आहे. मिडिया आणि स्वतंत्रपणे ब्लॉगसाईट, यू ट्यूब किंवा इन्स्टाग्रामवर कार्यरत असलेल्या सगळ्या मिडियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीप्रमाणे विरोध न करता एकमुखी पाठिंबा दिला आहे. विवेकबुध्दी आणि संयमाला फाटा दिल्याचे एकही उदाहरण नाही. कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका समोर दिसत असताना जनतेचा बुध्दिभेद करणे गैर ठरते ह्याद्दल मिडियाचे मतैक्य आहे. गेल्या तीनचार दिवसात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोना मृत्यूची संख्या वाढत असली तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव साथ म्हणवण्याइतपत झालेला नाही ह्या आरोग्य यंत्रणेच्या मताशी मिडियाने असहमती दर्शवल्याचे दिसत नाही. तपासणी किटची टंचाई किंवा औषध पुरवठ्याच्या अडचणी ह्याबद्दल मिडियाने सरकारला किंवा संबंधित यंत्रणेला मुळीच धारेवर धरले नाही. मिडियाकडून अजून तरी अभूतपूर्व संयम पाळला जात आहे हे सुदैव!
कोरोना संकटाशी देश सामान करत असतानाच्या काळात एखाद दुसरा विनय दुबे निघाला हे खरे, परंतु त्याला पोलिसांनी लगेच अटक केली हेही महत्त्वाचे आहे. विनय दुबेला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्याचा गुन्हा साधा नाही. त्याने केलेला गुन्हा हा ख-या अर्थाने देशद्रोहाचा गुन्हा म्हणावा लागेल. पोलिस तपासाला ७ दिवसांचा अवधी पुरेसा ठरावा अशी अपेक्षा आहे. मात्र ह्य खटल्याची त्वरेने सुनावणी होऊन त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळाली तर पोलिस आणि सामान्य जनतेचे मनोधैर्य उंचावण्यास निश्चितपणे मदत होईल. विनय दुबे ही राजकारणात शिरू इच्छिणारी उटपटांग प्रवृती आहे. ती वेळीच ठेचली पाहिजे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: