Sunday, April 26, 2020


कृष्णाष्टमी, रामजन्मोत्सव आणि हनुमानजयंती!  भारतात ज्याची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते त्यात पर्शुरामाचेही नाव घेतले पाहिजे. भगवान पर्शुराम रामरावण युध्दानंतर २०० वर्षांनी आणि महाभारत युध्दाच्या ६०० वर्षांआधी ह्या काळात केव्हातरी होऊन गेला. पुराणात त्याच्या कर्तृत्वाविषयी खूपच माहिती मिळते. पर्शुराम हा विष्णूच्या १० अवतारांपैकी एक!  भार्गव पर्शुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आणि वडिल जमदग्नीच्या सांगण्यावरून त्याने आपली आई रेणुका हिला ठार मारले (?) ह्या दोन गोष्टी मात्र भार्गव पर्शुरामाच्या जीवनाशी निगडित आहेत. बाकी कशाबद्दलही एकवाक्यता नसली तरी ह्या दोन गोष्टींबद्दल सर्वत्र एकवाक्यता आढळते
हरिवंशात आलेल्या कथेनुसार पर्शुरामाने हैययवंशीय बलाढ्य राजा सह्स्रार्जुन आणि त्याच्या उन्मत्त मांडलिक राजांनाही ठार मारले. त्याच्या कार्यकर्तृत्वाची ही नकारातमक बाजू वगळता त्याने यादववंशीय राजांना आत्मविश्वास प्राप्त करून देण्याचे महद्कार्य केले हे मात्र कोणाला फारसे माहित नाही. तो सप्तसिंधूतून सहस्रार्जुनाचा कैदी म्हणून नर्मदा परिसरात आला होता. तो सहस्रार्जुनाचा कैदी कसा झाला? नर्मदातीरावरील महिष्मतीपासून पश्मिमेकडे उडिशा पर्यंत, पश्चिमेकडे थेट सुराष्ट्र ( सौराष्ट्र ) आणि आनर्त( सध्याचा दक्षिण गुजरात ) आणि परान्त-अपरान्तपर्यंत (  परान्त म्हणजे सध्याचा सुरत परिसर आणि अपरान्त म्हणजे सध्याचे ठाणे आणि उत्तर कोकण ) त्याने मजल मारली. ठाणे प्रांताला लागून असलेल्या भडोच शहराचे नाव हे तर भृगूकृच्छचे अपभ्रंश! चिपळूणजवळच्या टेकडीवर परशुरामाचे भव्य मंदिर उभे असून हा परिसर चित्पावन ब्राह्मणांचे वस्तीस्थान म्हणून ओळखले जाते. चित्पावन ब्राह्मणांच्या उत्त्पत्तीशीही परशुरामाची कथा निगडित आहे. परशुरामाचे भव्य मंदिर ही पर्शुरामभूमीची आणि चित्पावनांच्या उत्त्पत्तीची खूणच! अर्थात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
सहस्रार्जुनाबरोबर परशुरामाचे युध्द हे तोडीस तोड ठरेल. त्या युध्दात परशुरामाने सह्स्रार्जुनास सहज ठार मारले. परशुरामाचे चरित्रही राम-कृष्णाच्या चरित्राइकतेच चित्तथरारक आहे. परशुरामालाही बाळपणापासून अनेक संकटातून जावे लागले. तो लहान असताना दस्यूंनी त्याला पळवून नेले. दस्यूंच्या तावडीतून त्याने स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. ती सुटका करून घेताना पतित मातापित्याच्या पोटी जन्माला आलेल्या त्याच्याच वयाच्या शुनःश्वेपची त्याची भेट होते. तो अंगिरा असल्याचे जेव्हा त्याला समजते तेव्हा त्याला वेदमंत्राचा अधिकार प्राप्त करून देण्याचे आश्वासन तो देतो. परशुरामाच्या जीवनावर गुजराती लेखक कन्हयालाल मुन्शी ह्यांनी गुजरातीत कादंबरी लिहीली आहे. ह्या कादंबरीचे १९५१ साली इंग्रजी भाषान्तर रंगराव दिवाकर ह्यांनी केले. ऋग्वेदात दाशराज्ञ युध्दाचा उल्लेख असलेल्या ऋचा आहेत. त्या ऋचा आणि वैदिक काळावर झालेल्या संशोधनाचा भक्कम आधार मुन्शींच्या कादंबरीला आहे.
आर्यांचे वस्तीस्थान उत्तरध्रुव होते असे अनेक संशोधकांचे मत आहे. त्या काळापासून भृगू ऋषींचे नाव विख्यात होते. भृगू ऋषींचे नाव गीतेच्या विभूतीयोग अध्यायात आले आहे. ‘महर्षीणां भृगूरहं’! परशुराम हा त्याच भृगू वंशाचा. इतर अनेक टोळ्यांप्रमाणे भृगूंचीही आर्यावर्तात आली. हैययवंशयांचे गुरूपद भृगूंकडे होते. परंतु सहस्रार्जुनाच्या उन्मत्तपणाला कंटाळून भृगूंनी त्याचे गुरूपद सोडले आणि ते सप्तसिंधूत परत फिरले. सप्तसिंधूत आर्यांच्या टोळ्या स्थिरावल्या तेव्हा वर्णव्यवस्था मुळीच नव्हती. प्रजेचे संरक्षण करू शकणा-या वर्गाकडे राज्येही आपोआपच आली. तपश्चर्या करून सातत्यपूर्वक ज्ञानोपसानेचा मार्ग  पत्करणा-यांचा आणखी एक वर्ग होता. तोच वर्ग ऋषी म्हणू ओळखला गेला. हे दोन वर्ग असले तरी चातुर्वर्ण्य व्यवस्था अस्तित्वात येण्यास उपनिषदांचा काळ उजाडावा लागला.
भृगू हे ऋषी ऋषीवर्गातले असले तरी खांद्यावर ठेवलेले परशु हातात घेऊन वेळप्रसंगी युध्दास उभे ठाकणारेही होते. परशुरामाचे वडिल जमदग्नी आणि भरतवंशीय गाधीचा पुत्र विश्वरथ ( हाच पुढे विश्वामित्र ऋषी म्हणून ओळखला गेला.) हे तृत्सू राजा दिवोदासाचे राज ऋषी अगस्त्य ह्यांच्या आश्रमात सहशिष्य होते. त्याच आश्रमात दिवोदासपुत्र सुदासही होता.  सप्तसिंधू परिसरात अगस्त्याच्या आश्रमाप्रमाणे लोपामुद्रा, वसिष्ठ आदींचेही आश्रम होते. वसिष्ठ हा अगस्त्यचा बंधू होता. राजर्षीपदात त्याला स्वारस्य नव्हते. खडतर तपश्चर्या करण्यासाठी त्याने सरस्वतीच्या पलीकडील तीरावर स्वतःचा आश्रम स्थापन केला होता. इंद्र, सवितृ, वरूण ह्या देवतांना रोज सरस्वतीच्या पात्रात उभे राहून अर्घ्य अर्पण करण्याचा आणि पितृत्व स्थानी असलेल्या सप्तर्षींना तर्पण करण्याचा ऋषींच्या नित्यक्रमाचा भाग होता. ऋग्वेदातल्या अनेक ऋचा ऋषींना स्फुरल्या त्या सरस्वतीच्या काठी नित्याचरण करत असतानाच्या काळात. भक्तीमार्गाचे मूळ ह्या ऋचातच आहे. हाच सवितृ पुराणांतरी विष्णूच्या रूपात अवतरतो.
स्पर्धा, मतमतान्तरे त्याही काळात वेगवेगळ्या आश्रमात होतीच. विशेषतः आर्यांचे दस्यूंबरोबरचे संबंध हा मतभिन्नतेचा मोठाच मुद्दा होता. आर्यांचे गोधन पळवणे, त्यांच्या मुली पळवणे सीमेलगतच्या भागावर आक्रमण करणे, त्यांचा भूभाग जिंकणे इत्यादी गोष्टी आर्यांच्या दृष्टीने उपद्रवकारक होत्या. एखाद्या घटनेवरून दोन्ही जमातीत सुरू झालेले वैमनस्य दीर्घ काळ चाले. त्याची सावली ऋषींच्या आश्रमावर पडली नसती तरच नवल होते. लोपामुद्रा ह्या स्त्रीऋषीचा आश्रम आणि राजाश्रयप्राप्त अगस्त्य ऋषीचा आश्रम ह्यांच्यातल्या स्पर्धेला जरा वेगळ्या प्रकारची धार होती. दस्यू सरसकट वाईट नाहीत असे लोपामुद्राचे मत होते. आपले मत ती ठासून मांडत असे. अगस्त्य ऋषींना मात्र तिचे मत मान्य नव्हते. नव्हे, ती मांडत असलेल्या मतांचे अगस्त्य वेळोवेळी खंडण करत असत.
दस्यूंचा राजा शांभरच्या सैनिकाने अगस्त्यच्या आश्रमातील विश्वरथला पळवून नेल्याची घटना घडली. त्या घटनेमुळे सप्तसिंधूत एकच खळबळ माजली. विश्वरथला सोडवण्यासाठी सर्व आर्य राजे दिवोदासच्या मदतीला धावून आले. विश्वरथला सोडवून आणण्यात त्यांना यश आले. पण चकमकीच्या काळात दोन अशा घटना घडल्या की सप्तसिंधूतील वातावरण पालटून केले. कोणत्या होत्या त्या २ घटना ? एक म्हणजे शांभर मारला गेला. दुसरी घटनाः विश्वरथ शांभरच्या कैदेत असताना शांभर-कन्या उग्रा विश्वरथच्या प्रेमात पडली. सुरूवातीला विश्वरथने तिला झिडकारून लावले खरे, पण नंतर सवितृ देवतेचा अनुकूल कौल मिळाल्यावर विश्वरथ उग्राशी विवाहबध्द झाला. लोपामुद्रालाही शांभरच्या सैन्याने कैद करून गडावर आणले होते. विश्वरथला सवितृने दिलेला कौल, उग्राचे विश्वरथावरचे शुध्द प्रेम पाहिल्यावर लोपामुद्राची खात्री पटली की शांभऱकन्या उग्रा ही मनाने खरीखुरी आर्य तरूणी आहे. ती निष्पाप आहे. जेव्हा गड जिंकून सगळी मंडळी खाली आली तेव्हा लोपामुद्रा विश्वरथच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली. ती स्वतःही अगस्त्यच्या प्रेमात पडली होती. अगस्त्य तिच्याशी विवाहबध्द झाला. हा सगळा कथाभाग मी येथे देत नाही.
ह्या सा-या घटनांमुळे केवळ दिवोदासच्या राज्यातच नव्हे तर, सप्तसिंधूत एकच खळबळ माजली. दस्यू आणि आर्य ह्यांच्या संबंधांना नवे वळण लागले. विश्वरथची पत्नी उग्राला मुलगा झाला. परंतु तो काळासावळा असल्यामुळे आर्य समाज त्याला स्वीकारणार नाही ह्याची कल्पना लोपामुद्राला आली होती. तिने चलाखीने मुलाला पळवून दुस-या बाळंतिणीच्या खोलीत नेऊन निजवले. आणि तिचे जन्मतः मृत मूल तिने उग्राच्या खाटेवर आणून ठेवले. विश्वरथला झालेला मुलगा मृत असल्याची बातमी तिने दिली. त्यानंतर थोडी शांतता प्रस्थापित झाली. परंतु दरम्यानच्या काळात उग्राच्या मागावर असलेल्या शांभरच्या पुरोहिताने उग्राला ठार मारले. हे सगळे घडत असताना त्याच्या वर्तुणुकीने विश्वरथ लोकप्रिय झाला.  लोकप्रियतेमुळेच तो विश्वामित्र म्हणून ओळखला जाऊ लागला. अगस्त्य आणि लोपामुद्रा दोघेही तृत्सूग्राम सोडून गेले. अगस्त्यच्या आश्रमाचा प्रमुख म्हणून जमदग्नीची नेमणूक केली गेली. त्याला राजर्षी पदही मिळते.
हा सगळा कथाभाग घडत असतानाच्या काळात जमदग्नीची पत्नी रेणुका प्रसूत झाली. त्याचेच नाव राम ठेवण्यात येते. तोच परशुराम!  परशुरामाचे दिसायला अत्यंत तेजस्वी होता. वयाच्या मानाने तो चांगला धिप्पाडही दिसत असे. चंचल प्रकृतीचा, एखाद्या गोष्टीसाठी हटट् धरला की तो पुरा झाल्याशिवाय स्वस्थ न बसणारा तो होता. दिवोदासची कन्या लोमहर्षिणीदेखील त्याच्याच वयाची असते. आश्रमातील सारी मुले एकत्र खेळतात. त्या मुलात लोमहर्षिणीदेखील सामील होत असे. परशुरामाला शस्त्रास्त्राचे शिक्षण देण्यावर जमदग्नीचा सहकारी कवी चयमान भर देतो. जमदग्नीला मात्र असे वाटत असे की परशुरामाला शस्त्रास्त्राच्या शिक्षणापेक्षाही शास्त्राचे, ईश्वरनिष्ठ ब्रह्मविद्येचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्यावरून जमदग्नीशी तीव्र मतभेद झाल्याने कवी चयमान आश्रम सोडून गावी निघून गेला. परशुराम त्याला परत आणण्यासाठी कोणालाही न सांगता निघून जातो. त्या प्रवासात परशुरामावर अनेक संकटे आली. तो दस्यूंच्या तावडीत सापडला. रात्रीच्या अधारात तो स्वतःची सुटका करून घेतली. पण त्यानंतर तो आणखी पणिच्या तावडीत सापडला मुलांना विकून द्रव्य कमावण्याचा पणिचा विचार असतो. त्यावेळी शुनःस्वेप नावाच्या मुलासही पणिने पळवून आणले होते. शुनःश्वेपला उपासनारहस्य जाणून घेण्यात रस होता. पण  तो पतित बापाचा मुलगा असल्याने उपासनेची संधी त्याला मिळणे शक्य नव्हते. म्हणून तो खिन्न होता. दोघांची एकमेकांशी ओळख होते. श्वेनःशुपला पतितमुक्त करण्याचे आश्वासन परशुरामाने त्याला दिले. दोघेही पणिच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी होतात. परशुरामाचेही लोपामुद्राप्रमाणेच असते. ज्याला गायत्री मान्य तो आर्यच. गायत्रीवर ज्याची नितांत श्रध्दा आहे तो आर्यच, मग तो जन्माने कोणी का असेना!
इकडे दिवोदासच्या राज्य दिवोदासपुत्र सुदास ह्याच्याकडे येते. विश्वरथाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सुदासच्या मनात मात्र खळबळ माजत असते. तृत्सूग्राम हीसुध्दा भरताची शाखा असल्यामुळे विश्वमित्राला सुदास हा मनोमन शत्रू समजून चालतो. परंतु राज्य संपादन करण्यात विश्वरथला अजिबात स्वारस्य नव्हते. ह्याही बाबतीत त्याने सवितृदेवतेचा कौल घेतला होता. त्याची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली की त्याचे नाव विश्वामित्र पडले. अवघ्या सप्तसिंधूत तो विश्वामित्र म्हणून ओळखला जाऊ लागला.
दरम्यान लोमहर्षिणीचा विवाह सहस्रार्जुनाशी करण्याचे सुदास योजतो. तिला मात्र सहस्रार्जुनाशी विवाह नको होता. सुदासच्या निमंत्रणालरून सहस्रार्जुन सप्तसिंधूत येतो. परंतु जमदग्नीशी आणि वसिष्ठशी उद्दामपणे बोलल्यामुळे त्याचे तृत्सूग्राममध्ये मनःपूर्वक स्वागत झाले नाही. त्यावेळी लोमहर्षिणीही आजोळी गेलेली असते. तिला पळवून नेण्याचा घाट सहस्रार्जुनाने घातला. त्यात तो यशस्वीही झाल. मात्र, त्यावेळी परशुरामही त्याच्या तावडीत सापडला. सगळ्या जणांना सहस्रार्जुन त्याच्या राज्यात घेऊन गेला.
इथून पुढे काळात परशुरामाच्या कार्यकर्तृतवाचा काळ सुरू होतो. सहस्रार्जुनाच्या राजप्रासादात जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न परशुराम करतो. परंतु तो ऐकण्याच्यापलीकडे गेलेला असतो. त्याला तो कैदेत टाकतो. त्याच्या कैदेतून परशुराम सुटून शेजारच्या दस्यू राज्यात जातो. दस्यूराज डड्डीनाथ ह्याला त्याने पित्यसमान मानले. पुढे तो त्याचा शिष्यही झाला. डड्डीनाथानेही त्याला अनेक प्रकारच्या सिध्दी दिल्या. तेथून परतल्यावर यादवांवर सहस्रार्जुनाकडून होणारा अन्याय दूर करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. अनुपदेश दुष्काळाने पीडित होता. परशुरमाच्या तपस्येने नदीला पाणी आले. जात्याच आळशी असलेले यादव खूश झाले. त्यांच्यातला आळस दूर करण्याचा आणि त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न करण्याचा प्रयत्न परशुरामाने सुरू केला. सह्स्राग्जुनाला हे समजते तेव्हा परशुरामाशी युध्द केल्याशिवाय अन्य उपाय नाही ह्या निष्कर्षावर तो आला. सहस्रार्जुनाशी युध्द करणे सोपे नाही ह्याची परशुरामालाही कल्पना असते. बरोबर सैन्य घेऊन तो लोमहर्षिणीसह (दरम्यान तो लोमहर्षिणीशी विवाहबध्द झाला.) सप्तसिंधूकडे जणयासाठी तो निघतो. परशुराम अर्थात त्याच्या मागावर गेला. पण त्याला थोडा विलंब झाला होता.  दोन्ही सैन्यात मात्र खूप अंतर राहिले. ह्यापुढच्या काळात परशुरामाच्या कर्तृत्वाचा दुसरा टप्पा सुरू होता. तो आपण उत्तरार्धात पाहू.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: