Monday, April 20, 2020

दुजाभाव कां?

व्यक्ति किंवा व्यक्तींचा एखादा समूह सत्तांध झाला की सर्वात आधी काय होत असेल तर त्याची विवेकबुध्दी नष्ट होते. दुर्दैवाने राज्यात काही घटना अशा घडल्या की ज्याचे भांडवल करण्याची  संधी विरोधक आणि समाजकंटक सोडायला तयार नाहीत. कोरोना संकटाशी झुंजत आहे. अशी वेळी राज्यात झालेल्या दंगधोप्याच्या घटनांबद्दल सरकारला जबाबदार धरण्याचे विरोधकांचे छुपे प्रयत्न सुरू आहेत. एककीडे बांद्रा स्टेशनवर गर्दी जमवणा-या विनय दुबेला अटक करून कोर्टात उभे केले जात असताना दुसरीकडे उध्दव ठाकरे ह्यांना राज्यपालनियुक्त कोट्यातील आमदारकी बहाल करण्याच्या प्रस्तावाची कशी वासलात लावता येईल ह्याच्या योजना शिजत होत्या!  अर्थात त्यात विरोधकांना यश मिळेल की नाही ह्याबद्दल संशय आहे.
पालघर जिल्ह्यात झालेल्या तिघांच्या निर्घृण हत्त्येला धार्मिक रंग फासण्याचा प्रयत्न सुरू झाला. नेमके ह्याच वेळी महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची कारणे शोधण्यापेक्षा महाराष्ट्रात डॉक्टर्स, उच्च अधिकारी आधींचा समावेश असलेले एक पथक पाठवण्याचा विर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या कोरोना लढ्याला गालबोट लावण्याचा तर हा छुपा प्रयत्न नाही? वास्तविक केंद्राच्याही आधीपासून महाराष्ट्र सरकारने संचारबंदी कम् टाळेबंदी जाहीर केली. कोरोनाला रोखण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून विमानतळे बंद करण्याची सूचना केली. कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स आणि त्यांच्या सहायकांना पीपीइ किट पुरवण्याचे केंद्राचे काम काहीशा मंद गतीने सुरू होते. त्याचा फटका जास्तीत जास्त महाराष्ट्राला बसला. परंतु ते लक्षात घ्यायला केंद्र सरकार तयार नाही.
वास्तविक मुंबई, पुणे, ठाणे-कल्याण, भिवंडी, पनवेल, नागपूर, औरंगाबाद ह्यासारखी ही गर्दीची आणि दाट लोकवस्तीचीही शहरे महराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातला कोरोना संसर्ग वाढल्याचे चित्र दिसते. मुळात ह्या शहरातील बहुसंख्य नागरिक छोट्या घरात राहतात. कोरोनापासून वाचवण्याइतपत सुरक्षित अंतर राखणेही त्यांना घरातल्या घरात  शक्य नाही. निम्मे शहर हे सारे जीवनव्यवहार नुक्कडवर उरकत असते. हे केंद्र सरकार लक्षात घ्यायला तयार आहे की नाही? शेजारच्या कर्नाटक राज्यात पुढा-यांचे लग्न सोहोळे सुरू आहेत. गुजरात राज्यातील सुरत शहरातील मजूर गावी निघण्यासाठी झुंडीने निघत असल्याचे व्हिडिओ चित्रवाहिन्यांवर दाखवण्यात आले. दोन्ही राज्यातील सरकारे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकार काय करत आहे हे पाहण्यासाठी तेथे केंदरीय पथक पाठवण्याचा विचारही केंद्राला सुचला नाही. दोन्ही राज्ये भाजपाशासित आहेत म्हणून? केरळ आणि गोवा राज्याने करोनाचा यशस्वी मुकाबला केला. परंतु त्यांच्याबद्दल कौतुकाचे दोन शब्द केंद्र सरकार बोलले नाही.
उत्तरप्रदेश सरकारने करोना घालवण्यासाठी काय केले, ह्याचा शोध घेण्याऐवजी केंद्र पश्चिम बंगालचीच अधिक चिंताकरत बसले आहे!  मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान ह्यांचा लगबगीने शपथविधी उरकण्याचा उत्साह दाखवणारे केंद्र सरकार इंदौर शहरात करोनाचा कहर सुरू झाल्याचे दिसत असूनही इंदौर वाचवण्यासाठी कोणती पावले टाकली असा साधा प्रश्न मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहांनाना विचारावासा केंद्र सरकारला वाटला नाही!
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. इथले अर्थचक्र सुरू झाल्याखेरीज देशाचे अर्थचक्र सुरू होणार नाही. जवाहरलाल नेहरू पोर्टकडे जाणारी आणि तेथून बाहेर पडणारी वाहतूक लौकरात लौकर सुरू करण्यासाठी मदत हवी का, असे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला विचारल्याचे ऐकिवात नाही. तेच मुंबईच्या बाबतही आहे. संचारबंदी थोडी शिथील होताच कसोशीने कार्यसंस्कृती जपणारी बिच्चारी मुंबईची जनता लगेच रस्त्यावर आली !  काम करण्यासाठी आपण सिध्द आहोत हेच त्यांनी दाखवून दिले. मुंबईतल्या वाहनांच्या गर्दीचे चित्र छापून आलेले वर्तमानपत्र हातात फडकावून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जाऊ शकतो!
कोरोनाशी लढतानाच्या ह्या असामान्य परिस्थितीत निरनिराळ्या राज्यांशी वागताना केंद्र सरकार दूजा भाव करणार नाही एवढीच अपेक्षा! हातातोंडाशी आलेली सत्ता गमावून बसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांचा एखादे वेळी संयम आणि विवेक युटला तर सुटू द्या! परंतु कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या सत्तेवर असलेल्या नेत्यांनी संयम आणि विवेक सोडू नये. तसा तो सुटणार नाही ह्याची राज्यातील जनतेला निःसंशय खात्री आहे.
तरीही, एकच इशारा द्यावासा वाटतो, रात्रच नव्हे तर दिवसही वै-याचे आहेत !
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: